जळगावा जिल्हाभुसावळमहाराष्ट्र

अली यावर जंग’ संस्थेचा मोठा दावा; अपूर्ण तपासणी, बनावट स्वाक्षरी आणि खोट्या कागदपत्रांचा आरोप

नाथाभाऊ खडसे यांच्या तक्रारीची दखल; भुसावळ थर्मल स्टेशनमधील अभियंत्याच्या अपंगत्व प्रमाणपत्राबाबत धक्कादायक खुलासा

भुसावळ/दीपनगर | प्रतिनिधी

भुसावळ औष्णिक वीज केंद्र (महानिर्मिती) येथे कार्यरत असलेल्या एका वर्ग-२ च्या अभियंत्याने सादर केलेल्या अपंगत्व प्रमाणपत्रासंदर्भात गंभीर अनियमितता समोर आल्याचा दावा करण्यात आला आहे. ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री आमदार एकनाथराव (नाथाभाऊ) खडसे यांनी केलेल्या तक्रारीची दखल घेत मुंबई येथील अली यावर जंग राष्ट्रीय वाक् एवं श्रवण दिव्यांगजन संस्थान (AYJNISHD) यांनी संबंधित कागदपत्रांबाबत प्राथमिक पडताळणी करत महत्त्वाची माहिती पत्राद्वारे दिली आहे.

मा. नाथाभाऊ खडसे यांनी दि. १० जुलै २०२६ रोजी संस्थेकडे अधिकृत पत्र पाठवून भुसावळ औष्णिक वीज केंद्रात कार्यरत अभियंता माधव गोविंदराव केंद्र यांच्या अपंगत्व प्रमाणपत्राची सत्यता आणि संबंधित प्रशासकीय बाबींची चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यावर उत्तर देताना संस्थेचे संचालक डॉ. सुमन कुमार यांनी दि. १३ जुलै २०२६ रोजी पत्र क्रमांक DO/2026/1674 द्वारे संबंधित नोंदींबाबत माहिती दिली.

संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, संबंधित अभियंता ७ जुलै २०२५ रोजी श्रवण तपासणीसाठी संस्थेत उपस्थित झाले होते. मात्र, प्राथमिक चाचणीतील प्रतिसाद विश्वसनीय न आढळल्याने त्यांना BERA/ABR या प्रगत वैद्यकीय तपासणीसाठी २२ सप्टेंबर २०२५ रोजी पुन्हा हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले होते. तथापि, ते नियोजित दिवशी उपस्थित राहिले नसल्याने त्यांची तपासणी पूर्ण होऊ शकली नाही, असे संस्थेने नमूद केले आहे.

याशिवाय, भुसावळ औष्णिक वीज केंद्रात सादर करण्यात आलेले कथित पत्र (क्रमांक AYJNISHD(D)/AVD/2025/1366, दि. १४ जुलै २०२५) तसेच ५० टक्के अपंगत्व दर्शविणारा कथित अहवाल हा संस्थेने जारी केलेला नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. संबंधित कागदपत्रांवरील संचालकांची स्वाक्षरीदेखील बनावट असल्याचा दावा संस्थेने आपल्या पत्रात केला आहे.

या प्रकरणात मा. नाथाभाऊ खडसे यांनी केलेल्या तक्रारीची दखल घेतल्याबद्दल संस्थेने त्यांचे आभार मानल्याचेही पत्रात नमूद करण्यात आले आहे. या खुलाशामुळे भुसावळ औष्णिक वीज केंद्रातील संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, पुढील प्रशासकीय कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button