वर्षावास बुद्ध आणि ‘त्यांचा धम्म’ ग्रंथ पठण समारोप सोहळा उत्साहात संपन्न खामगाव प्रतिनिधी – जी. डी. रोकडे

खामगाव तालुक्यातील जनुना येथे स्थित महा प्रजापती गौतमी बुद्ध विहार येथे आज “बुद्ध आणि त्यांचा धम्म” या पवित्र ग्रंथाच्या पठणाचा समारोप सोहळा अत्यंत भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.
कार्यक्रमाची सुरुवात मंगलमैत्री रॅलीने झाली. “सबका मंगल हो, सबका कल्याण हो” अशा घोषणांनी जनुना गावातील सर्व रस्ते दुमदुमून गेले. उपासक-उपासिका, महिला मंडळ सदस्य, युवक वर्ग आणि पंचशील क्रीडा मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
यानंतर मंचावर समाजभूषण अशोक भाऊ सोनोने यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित राहिले. दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची औपचारिक सुरुवात करण्यात आली. सर्व उपस्थितांनी सामूहिक बुद्ध वंदना, त्रिशरण-पंचशील ग्रहण आणि याचना सत्रात सहभाग घेतला.
भिक्षु संघाला भोजनदान तसेच चिवरदान अर्पण करण्यात आले. संघाच्या आशीर्वादाने आणि सरनतय घेऊन या वर्षावास पठण कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
या धार्मिक सोहळ्यात माता रमाई महिला मंडळ, पंचशील क्रीडा मंडळ, तसेच विविध गावांतील बौद्ध बांधव आणि युवकांनी उत्साहपूर्ण सहभाग नोंदवून कार्यक्रम यशस्वी केला.



