लाच घेतांना वनपाल अडकला

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
श्याम पहूरकर
शेगांव
जळगाव जा. तालुक्यात काल ६ मे रोजी वन विभागाच्या वनपालास १० हजार रूपयांची लाच घेतांना लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. मिळालेल्या माहितीनुसार वनपरीक्षेत्र अधिकारी कार्यालय (प्रादेशिक) जळगाव जामोद येथे दाखल एका वन गुन्ह्यामध्ये आरोपी न करण्यासाठी वनपाल शे. कलीम शे. बिबन (४८) रा.उमाळी ता. मलकापूर ह.मु. कृष्णानगर जळगाव जामोद याने एका
व्यक्तीकडे १० हजार रूपयांची लाच मागितली होती.
तक्रारदारास लाच देणे मंजूर नसल्याने त्यांनी एसीबी कार्यालयात तक्रार दिली. त्यावरून काल ६ मे रोजी आरोपी लोक सेवक यांची पंचासमक्ष लाच मागणीबाबत पडताळणी केली असता त्याने तक्रारदार यांच्याकडे १० हजार रूपयांची मागणी करून लाच रक्कम स्वीकारण्याची संमती दिली. त्यावरून सापळा रचून लोकसेवक वनपाल शेख कलीम शेख बिबन याने पंचासमक्ष
लाच स्वीकारली. त्यावेळी त्याला एसीबी पथकाने रंगेहाथ पकडले. याप्रकरणी त्याच्या विरूध्द पोलीस स्टेशन जळगाव जा. येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई बुलढाणा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकात सहभागी पो. नि. सचिन इंगळे, स. फौजदार श्याम भांगे, पोहेकों प्रवीण बैरागी, पो.ना. विनोद लोखंडे, जगदीश पवार, पोकों रणजीत व्यवहारे, चालक पोना नितिन शेट्ये, चालक पोकों अरशद शेख यांनी केली.



