खानदेशजळगावा जिल्हामहाराष्ट्रमुबई

जळगाव जिल्ह्यातील २६ गावांच्या दूषित पाणीप्रश्नी एकनाथराव खडसे आक्रमक; विधान परिषदेत सरकारला विचारला जाब

जळगाव जिल्ह्यातील ग्रामीण भागातील जनतेच्या आरोग्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून,जिल्ह्यातील ६ तालुक्यांमधील २६ गावांमध्ये पिण्याचे पाण्याचे स्त्रोत दूषित झाल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असल्याचा गंभीर मुद्दा आमदार एकनाथराव खडसे यांनी विधान परिषदेत तारांकित प्रश्नाद्वारे उपस्थित केला. दूषित पाण्यामुळे टायफॉइड, कॉलरा आणि हिपॅटायटीस-ए सारख्या आजारांचा धोका वाढला असून, प्रशासकीय यंत्रणेने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप खडसे यांनी यावेळी केला.
आमदार एकनाथराव खडसे यांनी सभागृहात माहिती देताना सांगितले की, जळगाव जिल्ह्यातील सहा तालुक्यांमधील २६ गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत दूषित झाले आहेत. यामुळे ग्रामीण भागात टायफॉइड, कॉलरा, हिपॅटायटीस-ए (कावीळ) आणि अतिसारासारख्या गंभीर आजारांच्या रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. आरोग्य विभागाने ५ डिसेंबर २०२५ रोजी किंवा त्यादरम्यान केलेल्या सर्वेक्षणात ही बाब समोर आली असतानाही, प्रशासनाकडून ठोस उपाययोजना करण्यात का विलंब झाला, असा संतप्त सवाल खडसे यांनी उपस्थित केला. नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून, शासन यावर काय कार्यवाही करत आहे आणि अशा गावांमध्ये जलशुद्धीकरण करण्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या जात आहेत, याचा जाब खडसे यांनी विचारला.
एकनाथराव खडसे यांच्या प्रश्नाला उत्तर देताना पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी माहिती दिली की, नोव्हेंबर २०२५ मध्ये जळगाव जिल्ह्यात एकूण २,३६६ पाणी नमुन्यांची तपासणी करण्यात आली होती. यामध्ये ३४ नमुने दूषित आढळले होते ज्यातील ३१ नमुने ग्रामीण भागातील तर ३ शहरी भागातील होते
प्रकल्प संचालक (जजमि) यांच्या अहवालानुसार, दूषित आढळलेल्या या ३४ नमुन्यांची तातडीने पुनर्तपासणी करण्यात आली असून ते आता पिण्यायोग्य असल्याचा अहवाल सादर केला आहे.
ज्या स्त्रोतांचे पाणी दूषित होते त्यांचे जल शुद्धीकरण करण्यात आले त्या ठिकाणी तीन दिवस सलग ‘सुपरक्लोरिनेशन’ प्रक्रिया राबवण्यात आली. त्यानंतर केलेल्या तपासणीत हे सर्व नमुने पिण्या योग्य आढळले आहेत.
सध्या या गावांमध्ये ‘ट्रॉपिकल क्लोरिनेटेड लाईम’ (टी.सी.एल.) चा वापर करून दैनंदिन पाणी शुद्धीकरण केले जात आहे.
जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या अहवालानुसार, जलजन्य आजारांचे रुग्ण आढळले असले तरी टायफॉइड आणि हिपॅटायटीस-ए च्या रुग्णांमध्ये सध्या वाढ दिसून येत नसल्याचे
पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले.ग्रामीण भागातील जनतेला शुद्ध आणि सुरक्षित पाणी मिळावे, यासाठी खडसे यांनी घेतलेल्या या भूमिकेचे जळगाव जिल्ह्यातून स्वागत होत आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button