जळगावा जिल्हामहाराष्ट्र

धनंजय मुंडेंना अर्धांगवायूचा झटका ? ; सहकारमंत्र्यांनी दिली माहिती !

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी

१९  एप्रिल २०२५

राज्यातील महायुती सरकारमधून मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर आमदार धनंजय मुंडे सक्रीय राजकारणापासून दूर असल्याचे पाहायला मिळाले. उपमुख्यमंत्री अजित पवार बीड दौऱ्यावर असताना देखील धनंजय मुंडे अनुपस्थित होते. त्यावेळी त्यांनी प्रकृतीचे कारण दिले होते. अशात आता धनंजय मुंडेंना अर्धांगवायूचा झटका आला होता, त्यांना नीट बोलता येत नाही, अशी माहिती राज्याचे सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी दिली.

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आमदार धनंजय मुंडेंच्या निकटवर्तीयांना अटक करण्यात आली. त्यांच्यावर मकोकाही दाखल करण्यात आला. संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येचे फोटो व्हायरल झाल्यानंतर धनंजय मुंडे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर ते विधिमंडळाच्या अधिवेशनात तसेच सार्वजनिक कार्यक्रमात कुठेही दिसले नाहीत. अजित पवारांच्या दौऱ्यावेळीही ते प्रकृतीचे कारण देत मुंबईत होते. त्यात आता धनंजय मुंडेंना अर्धांगवायूचा झटका आला होता, असे बाबासाहेब पाटील म्हणाले. या संदर्भातील वृत्त ‘एबीपी माझा’ने दिले आहे.

बीडमधील पिंपळनेर येथे गुरुवारी भगवान गडाचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमाला धनंजय मुंडे आणि भाजपचे आमदार सुरेश धस एकत्र दिसणार होते. पण ऐनवेळी धनंजय मुंडे यांचा दौरा रद्द झाला. यावरून विविध चर्चा सुरू आहेत. याबाबत राज्याचे सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांना विचारले असता, धनंजय मुंडेंची तब्येत ठीक नाही, त्यांना अर्धांगवायूचा झटका आला असून डोळे देखील वाकडे झाले आहेत. त्यांना बोलताही येत नाही, असे बाबासाहेब पाटील यांनी सांगितले. तसेच, आमच्या मिटिंगला ते मुंबईत येतात ना. काही कार्यक्रमांना ते हजेरी लावतात, जवळच्या व्यक्तींना आग्रह केल्यानंतर त्या कार्यक्रमांना ते जातात, असेही सहकारमंत्र्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, धनंजय मुडेंनी प्रकृतीच्या कारणास्तव काही वेळ विश्रांती घेतल्याचे सांगितले होते. तर, काही दिवसांपूर्वी मुंबईत त्यांच्यावर डोळ्याच्या उपचारासाठी शस्त्रक्रिया देखील झाली होती. तेव्हापासून ते माध्यमांपासून व सार्वजनिक कार्यक्रमातून दूर आहेत.

दरम्यान, मला झालेला आजार अर्धांगवायू नसून बेल्स पाल्सी आहे, असे स्पष्टीकरण धनंजय मुंडे यांनी दिले आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले की, आमचे सहकारी, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी केलेल्या एका विधानावरून मला अर्धांगवायू झाल्याचे वृत्त काही वाहिन्यांवर प्रसारित केले जात आहे. मुळात मला बेल्स पाल्सी हा आजार दीड महिन्यांपूर्वी झालेला असून त्याचा परिणाम चेहऱ्यावर झाल्याने अजूनही मला बोलायला त्रास होतो. बाबासाहेब पाटील यांची व माझी दोन दिवसांपूर्वी एका बैठकीत भेट झाली होती. त्यांनी माझ्याबद्दल काळजी व्यक्त केली त्याबद्दल आभार. मात्र मला झालेला आजार हा अर्धांगवायू नसून बेल्स पाल्सी आहे व त्याचा व इतर काही वैद्यकीय बाबींचा त्रास अजूनही होतो असून बोलायला त्रास आहे. मात्र नव्याने मला कोणताही आजार झालेला नाही.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button