लॉंगमार्च – आपण काय करू शकतो ?

लॉंगमार्च – आपण काय करू शकतो ?स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस बुलढाणा प्रतिनिधी रामा इंदोरेजगाचे पोशिंदे हजारोंच्या संख्येने ऊन वारा पावसाची चिंता करता , त्यांच्या काही मूलभूत मागण्यांसाठी निघालेत मुंबई च्या दिशेने.मुंबई जिथे घेतले जातात निर्णय त्यांच्या जगण्या मरणाचे , हे आता त्यांना कळायला लागलंय !म्हणूनच ते अतिशय सनदशीर मार्गाने , नाचत गात , घोषणा देत निघालेत आपल्या मागण्या घेऊन.काय आहेत त्यांच्या मागण्या ?कसायला जमीन , शेतमालाला दुधाला भाव , शेतीसाठी दिवसा वीज , कोरा सातबारा , जुनी पेन्शन योजना , योग्य नुकसानभरपाई , फसवणूक मुक्त व्यवहार , किमान वेतन , जगण्याचा अधिकार मागत आहेत.75 वर्षाच्या स्वातंत्र्यानंतर आजही या मागण्यांसाठी समाजातील एका घटकाला अनवाणी , तुटलेल्या चपला घालून , बुरशी लागलेली भाकरी खावून उन्हातान्हात ही वेदनादायी पायपीट करावी लागत असेल , आणि तरी ही काही मंडळी एका द्वेषपूर्ण राजकारणाचा भाग म्हणून किंवा अंधभक्तीने ग्रासून त्यांच्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित करत असतील तर त्याच समाजाचा भाग म्हणून आपण शांत राहणं हा त्या शोषितांवर अन्यायच आहे . आणि ही भावना आपल्यापैकी प्रत्येक संवेदनशील , सद्सद्विवेक असलेल्याची आहे.पण मग प्रश्न पडतो आपण काय करू शकतो ?सगळ्यात पहिल्यांदा या लॉंगमार्चची भूमिका आणि मागण्या समजून घेवून पाठिंबा देवू शकतो.आपण या लॉंगमार्च मध्ये आपला सहभाग नोंदवू शकतो.ज्या दिवशी सहभागी होवू त्या दिवशी किमान एका आंदोलनकर्त्याचा डबा नेवू शकतो.वैद्यकिय क्षेत्रातील मंडळी जमेल तेव्हा वैद्यकीय सेवा देवू शकतात.व्यावसायिक मंडळी त्यांच्या परिसरात लॉंगमार्च येईल तेव्हा पाणी शक्य असेल तर सुक्या नाश्त्याची ( बिस्कीट , चिवडा , थालीपीठ इ ) व्यवस्था करू शकतात.राजकीय कार्यकर्ते पक्ष्याच्या पलीकडे आपल्या राबणाऱ्या आईबापांच्या पाठीशी ताकद उभी करू शकतात.गाव पातळीवर ग्रामसभा घेवून , पाठिंब्याचे ठराव मंजूर करू शकतात.शहरात , सोसायट्यात अशाच प्रकारे पाठिंब्याचे ठराव करू शकतात.विविध कार्यालयातील कर्मचारी वर्ग काळ्या फिती लावून पाठिंबा देवू शकतात.लॉंगमार्च विरोधात लिहिणाऱ्या विकृतींना समजवून मतपरिवर्तन किंवा सडेतोड उत्तर देवून त्यांना उघडं पाडू शकतो.लॉंगमार्च , त्यातील मागण्या यावर लेख , कविता , पोस्टर बनवून , प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया त देवू शकतो.तसेच समाज माध्यमांवर ( व्हाट्सअप्प , फेसबुक , ट्विटर , इन्स्टाग्राम ) लॉंगमार्च चे फोटो , बातम्या , व्हिडिओ पोस्ट करू शकतो. लॉंगमार्चच्या मागण्यांचा तसेच एकूणच सामाजिक विषयांवर अभिनव पद्धतीने रिल्स बनवून शेयर करू शकतो.हा छोटासा प्रयत्न आहे या सामाजिक आंदोलनाशी जोडून घेण्याचा ,काही महाभाग याला ही नावं ठेवणारच .पण हे पर्याय फक्त संवेदनशील मंडळी साठी आहेत.



