घराणेशाही ला सुरुंग लावण्यासाठी वंचितांची सत्ता आणा

मुक्ताईनगर येथील सभेत युवा नेते सुजात आंबेडकरांचे टीकास्त्र
प्रतिनिधी | मुक्ताईनगर :-
घराणेशाहीला सुरुंग लावण्यासाठी तसेच आरक्षण वाचवण्यासाठी वंचितांची सत्ता आणा असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी मुक्ताईनगर येथील कृषी उत्पन्न बाजार समिती बोदवड रोडवरील मैदानावर आयोजित सभे प्रसंगी केले. वंचित बहुजन आघाडीचे मतदार संघातील उमेदवार संजय ब्राह्मणे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभा प्रसंगी सुजात आंबेडकर बोलत होते.
सभा सुरू होण्यापूर्वी वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर हेलिकॉप्टरने मुक्ताईनगर येथील तालुका क्रीडा संकुल येथे उभारण्यात आलेल्या हेलिपॅडवर सायंकाळी 4:30 वाजता आगमन झाले.
सुरुवातीला मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार संजय पंडित ब्राह्मणे यांनी प्रास्ताविक केले व मतदार संघातील सर्व मतदार बंधूंना बहुजनांची सत्ता स्थापन करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे हात मजबूत करण्याचे आवाहन केले.
याप्रसंगी बोलताना सुजात आंबेडकर म्हणाले की, मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातील घराणेशाहीला सुरुंग लावण्यासाठी एस.सी.टी., ओ.बी.सी., मुस्लिम समाजाचे आरक्षण वाचविण्यासाठी तसेच तळागाळातील वंचितांपर्यंत सत्ता पोहोचविण्यासाठी बहुजनांची सत्ता आणण्यासाठी वंचित बहुजन आघाडीला साथ द्या. तसेच ते म्हणाले की तुमचे खासदार कोण आहे तुम्हा सर्वांना माहित आहे त्या बीजेपीच्या असून त्यांचे सासरे राष्ट्रवादी शरद पवार गटाचेे काम करतात व त्यांच्या कन्या आता विधानसभेसाठी तुतारी चिन्हावर राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवत आहे हे बघून मला आज कळाले की, हे वेगवेगळे आहेत. खासदारकी एकाला विधान परिषद दुसऱ्याला आणि आता विधानसभेला आपलीच मुलगी दुसऱ्या पक्षाकडून म्हणजे कोणत्याही पक्षाकडून कोणीही उभा राहो आणि या मतदारसंघातील सत्ता व निधी एकाच कुटुंबात राहिला पाहिजे याच्यासाठी पूर्ण नियोजन झालेले आहे आणि हे नियोजन फोडून काढायला वंचित बहुजन आघाडी या मतदारसंघात आली आहे.
याप्रसंगी जिल्हा सचिव विश्वनाथ मोरे, तालुकाध्यक्ष दिलीप पोहेकर, सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे राज्य प्रवक्ता कौस्तुभ शिंदे, महिला जिल्हाध्यक्ष वंदना सोनवणे, महासचिव समाधान गवई, एस एस तायडे , याच्यासह असंख्य कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.



