ऑक्सफर्ड इंटरनॅशनल ड्रीम स्कूलचा कबड्डीत धडाका; एकही सामना न गमावता पटकावले तालुकास्तरीय विजेतेपद!

संस्थापक प्रमोद घोंगे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ‘अजिंक्य’ संघाची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी कूच
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी शंकर शिवरकर
देऊळगावराजा ; तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा २०२६ अंतर्गत आयोजित १४ वर्षांखालील मुलांच्या कबड्डी स्पर्धेत ऑक्सफर्ड इंटरनॅशनल ड्रीम स्कूलच्या संघाने आपल्या उत्कृष्ट कौशल्याच्या जोरावर देऊळगावराजा तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावून ऐतिहासिक यश संपादन केले आहे. विशेष म्हणजे संपूर्ण स्पर्धेत या संघाने एकही सामना न गमावता ‘अजिंक्य’ राहून विजेतेपदावर आपले नाव कोरले.
स्पर्धेत सुरुवातीपासूनच उत्कृष्ट सांघिक ताळमेळ, आक्रमक चढाया आणि भक्कम बचावाच्या जोरावर ऑक्सफर्डच्या खेळाडूंनी प्रतिस्पर्धी संघांना पराभवाचा धूळ चारली. अंतिम सामन्यातही खेळाडूंनी मैदानावर अप्रतिम चपळाई दाखवत तालुक्यात अव्वल स्थान मिळवले. या दैदिप्यमान यशामुळे शाळेचा संघ आता बुलडाणा येथे होणाऱ्या आगामी जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत देऊळगावराजा तालुक्याचे प्रतिनिधित्व करणार आहे.
शाळेचे संस्थापक,श्री. प्रमोद घोंगे पाटील
यांच्या सक्षम मार्गदर्शनाखाली आणि क्रीडा शिक्षकांच्या विशेष परिश्रमामुळेच ग्रामीण भागातील खेळाडूंनी ही उंच भरारी घेतली आहे. खेळाडूंच्या या यशाबद्दल शाळेचे व्यवस्थापन, मुख्याध्यापक आणि क्रीडा शिक्षकांनी सर्व विजेत्या खेळाडूंचे विशेष कौतुक केले असून, जिल्हास्तरीय सामन्यांमध्येही अशीच विजयी घोडदौड कायम ठेवण्यासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.



