क्राईमगुन्हेगारीबुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

उसनवारीचे पैसे मागितल्याच्या वादातून मारहाण; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधी :–शंकर शिवरकर

देऊळगाव राजा .उसने दिलेले पैसे परत मागितल्याच्या कारणावरून झालेल्या वादात एका शेतकऱ्याला दगडाने मारहाण करून जखमी केल्याप्रकरणी पाच जणांविरुद्ध देऊळगाव राजा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिल साहेबराव चव्हाण (वय ३४, रा. गिरोली बु., ह.मु. साईनगर, ता. देऊळगाव राजा) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. त्यानुसार राहुल अशोक कुसळकर, संतोष रामदास पिटकर, गणेश रामदास पिटकर, राहुल शिवाजी शिंदे व आरती राहुल कुसळकर (सर्व रा. गिरोली बु.) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटना १८ जून रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास गिरोली बु. येथे घडली. फिर्यादीने आरोपी राहुल कुसळकर याला त्याच्या मुलाच्या उपचारासाठी ४० हजार रुपये उसने दिले होते. हे पैसे परत मागण्यासाठी फिर्यादी आरोपीच्या घरी गेले असता, आरोपीने पैसे देण्यास नकार देत शिवीगाळ केल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.
यावेळी आरोपीने फिर्यादीला धक्काबुक्की करून जवळ पडलेला दगड डोक्यात मारला. या मारहाणीत फिर्यादीच्या डोक्याला दुखापत होऊन रक्तस्त्राव झाल्याचे फिर्यादीत नमूद आहे. दरम्यान, संतोष पिटकर, गणेश पिटकर व राहुल शिंदे हे तेथे येऊन त्यांनीही फिर्यादीला चापट-बुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप आहे.
भांडण सोडविण्यासाठी फिर्यादीची पत्नी पूजा अनिल चव्हाण व वहिनी शीतल प्रभाकर मुधोळकर या मध्ये पडल्या असता, आरोपी आरती राहुल कुसळकर हिने त्यांनाही शिवीगाळ करून धक्काबुक्की केली तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
या प्रकरणी देऊळगाव राजा पोलिस ठाण्यात कायम अप. क्र. २७८/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १८९(२), ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२) व ३५१(३) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ संजय गोरे यांच्या ताब्यात देण्यात आला आहे.
विशेष म्हणजे, गिरोली बु. येथे १८ जून रोजी झालेल्या याच वादातून दोन्ही पक्षांनी परस्परविरोधी फिर्यादी दाखल केल्याने हे प्रकरण आता ‘क्रॉस केस’ म्हणून समोर आले आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button