जळगावा जिल्हाबुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

आयसीआय क्लासेसच्या विद्यार्थ्यांचा प्रामाणिकपणा; एक लाखांचे सोने केले परत

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधी – शंकर शिवरकर

देऊळगाव राजा : शहरातील आयसीआय क्लासेसच्या दोन विद्यार्थ्यांनी रस्त्यावर सापडलेले सुमारे एक लाख रुपये किमतीचे सोने परत करून प्रामाणिकपणाचे आदर्श उदाहरण समाजासमोर ठेवले. करण शिंदे व जयेश घुगे या दोन विद्यार्थ्यांना ७ सप्टेंबर रोजी सिव्हिल कॉलनी परिसरात सोने सापडले होते. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता हे सोने आयसीआय क्लासेसचे संचालक विनायक फूके सर यांच्याकडे सुपूर्द केले.
विनायक फूके सर यांनी परिसरात विचारणा केली असता, सिव्हिल कॉलनी परिसरात मेसचा व्यवसाय करणाऱ्या जया कुडे व चेतना सवडतकर या दोन्ही बहिणींची माहिती समोर आली. यातील जया कुडे यांचे सोने हरविल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर फूके सरांनी त्यांना बोलावून योग्य खात्री केली आणि विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत संबंधित सोने जया कुडे यांच्याकडे परत केले.
सोन्याची रक्कम मोठी असूनही विद्यार्थ्यांनी दाखविलेल्या प्रामाणिकपणाचे कौतुक करत जया कुडे व चेतना सवडतकर यांनी आयसीआय क्लासेसचे संचालक विनायक फूके सर तसेच दोन्ही विद्यार्थ्यांचे आभार मानले. यावेळी त्यांनी करण शिंदे व जयेश घुगे या विद्यार्थ्यांना 5 हजार रुपये रोख बक्षीस दिले. तसेच दोन्ही विद्यार्थ्यांना दोन महिन्यांसाठी मेस मोफत करून देण्याचा निर्णय घेतला.
जया कुडे व चेतना सवडतकर या दोन्ही महिला सर्वसामान्य कुटुंबातील असून, त्यांनी तब्बल दोन वर्षांच्या कष्टाच्या कमाईतून हे सोने घेतले होते. त्यामुळे हरविलेले सोने परत मिळाल्याने त्यांना मोठा दिलासा मिळाला.
यावेळी प्रतिक्रिया देताना आयसीआय क्लासेसचे संचालक विनायक ओके सर म्हणाले, “सोन्याची किंमत एक लाख रुपये जरी असली, तरी विद्यार्थ्यांनी दाखविलेला प्रामाणिकपणा कितीतरी पटीने अधिक आहे. विद्यार्थ्यांनी दाखवून दिले की, शिक्षण म्हणजे केवळ मार्क्स मिळवणे नाही, तर योग्य वेळी योग्य काम करण्याची ताकद आणि संस्कार आत्मसात करणे होय.”
विद्यार्थ्यांच्या या प्रामाणिकपणाबद्दल आयसीआय क्लासेसच्या वतीने करण शिंदे व जयेश घुगे यांचा सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या या कृतीचे परिसरातून कौतुक होत असून, त्यांच्या प्रामाणिकपणामुळे समाजासमोर एक सकारात्मक आदर्श निर्माण झाला आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button