जळगावा जिल्हामहाराष्ट्र

भालोद शाळेत सेवा सप्ताहानिमित्त शैक्षणिक दाखल्यांचे वाटप : पालकांच्या त्रासाला विराम देणारी अभिनव योजना

भालोद –
न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज, भालोद येथे सेवा सप्ताहानिमित्त एक अनोखी उपक्रमशील योजना राबवण्यात आली. 17 सप्टेंबर – भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जयंतीपासून ते 2 ऑक्टोबर – राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीपर्यंत देशभरात सेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून महसूल विभागाच्या पुढाकारातून विद्यार्थ्यांना शाळेतच शैक्षणिक दाखल्यांचे वितरण करून एक आदर्श पाऊल उचलण्यात आले.

या अभिनव उपक्रमामागे फैजपूर प्रांताचे प्रांताधिकारी मा. बबनराव काकडे यांची संकल्पना आहे. पारदर्शक, लोकाभिमुख व गतिमान महसूल कारभार हा उद्देश ठेवून पालकांना होणारा शारीरिक, मानसिक व आर्थिक त्रास कमी करण्यासाठी दाखल्यांचे वितरण थेट शाळेतच करण्याचा निर्णय घेण्यात आला. अत्यंत माफक शुल्क घेऊन विद्यार्थ्यांना शाळेच्या प्रांगणातच दाखले मिळाल्याने पालकांच्या त्रासात मोठी बचत झाली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रांताधिकारी बबनराव काकडे उपस्थित होते. पाहुण्यांच्या स्वागतानंतर मान्यवरांच्या हस्ते दाखले विद्यार्थ्यांना वितरित करण्यात आले. यानंतर आपल्या भाषणात प्रांताधिकारी काकडे म्हणाले की –
“दाखले मिळवण्यासाठी पालकांची होणारी ससेहोलपट संपवण्यासाठी ही योजना राबवली. शासनाच्या सहकार्याने व सहकाऱ्यांच्या पाठिंब्याने विद्यार्थ्यांना थेट शाळेतच दाखले मिळावेत यासाठी प्रयत्न केले आणि ते यशस्वी ठरले.”

विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांनी मेहनतीचे महत्त्व अधोरेखित केले. “स्पर्धात्मक युगात सर्वोत्तम जागा नेहमी रिकामी असते; ती मिळवण्यासाठी सर्वोत्तम मेहनत आवश्यक आहे,” असे प्रतिपादन त्यांनी स्वतःच्या अनुभवावरून केले.

या कार्यक्रमाला ना. तहसीलदार जगदीश गुरव, नि.ना. तहसीलदार बी.एम. पवार, तलाठी निलेश चौधरी, तलाठी सौ. हेमा सांगोळे, शाळेचे मुख्याध्यापक डी.व्ही. चौधरी तसेच महसूल विभागातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पालक वर्गातून या उपक्रमाचे कौतुक होत असून महसूल विभागाने दाखवलेल्या संवेदनशीलतेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. यावल-रावेरचे आमदार अमोल जावळे कार्यव्यस्ततेमुळे प्रत्यक्ष उपस्थित राहू शकले नाहीत; मात्र संदेशाद्वारे त्यांनी या उपक्रमाचे स्वागत करून शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डी.एस. सुरवाडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन बी.एन. पाटील यांनी केले.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button