काकनवाडा AG लाईन वारंवार बंद; शेतकरी संतप्त महावितरणकडे निवेदन देत तात्काळ वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी…..!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी:- मुकिंदा गव्हांदे जळगाव जामोद
संग्रामपूर:- २० मे २०२६
संग्रामपूर तालुक्यातील काकनवाडा परिसरात मागील अनेक दिवसांपासून AG लाईन वारंवार बंद पडत असल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत. सतत खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे शेती पिकांना पाणी देणे कठीण झाले असून अनेक शेतकऱ्यांच्या मोटारी जळण्याच्या घटना घडत आहेत. परिणामी परिसरातील शेतकरी संतप्त झाले असून त्यांनी महावितरण प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
याबाबत काकनवाडा येथील सर्व शेतकऱ्यांच्या वतीने महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी मर्यादित (महावितरण) उपविभाग वरवट बकाळ येथील कनिष्ठ अभियंता श्री कांबळे साहेब यांना सविस्तर निवेदन देण्यात आले. या निवेदनात AG लाईन मागील एक महिन्यापासून सुरळीत सुरू नसल्याचे नमूद करण्यात आले आहे. वारंवार लाईन बंद पडत असल्याने शेतकऱ्यांना रात्री अपरात्री शेतात जावे लागत असून पिकांना वेळेवर पाणी देता येत नसल्याने मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे.
शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, परिसरातील इतर गावांमधील AG लाईन नियमित सुरू असताना केवळ काकनवाडा येथील लाईनच अर्धा-अर्धा दिवस बंद राहत आहे. त्यामुळे वीजपुरवठ्याचा कोणताही निश्चित वेळ राहत नसून शेतकऱ्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. अनेक वेळा महावितरण कार्यालयात संपर्क साधूनही योग्य प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोपही शेतकऱ्यांनी केला आहे.
दि. १९ मे २०२६ रोजी रात्री मोठ्या संख्येने शेतकरी सब स्टेशन ला पोहोचले होते. त्यावेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तरे देण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. वारंवार तक्रारी करूनही कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात आलेली नसल्याने शेतकऱ्यांचा संताप वाढत आहे.वीजपुरवठा खंडित होत असल्याने शेती पिकांवर गंभीर परिणाम होत आहे. उन्हाच्या तीव्रतेमुळे आधीच पिके संकटात असताना पुरेशा प्रमाणात पाणी न मिळाल्याने उभी पिके करपण्याची भीती निर्माण झाली आहे. शिवाय आठवडाभरात केवळ चार ते आठ तासच वीज मिळत असल्याने शेतीचे संपूर्ण नियोजन कोलमडले आहे. यामुळे आर्थिक नुकसानासोबत मानसिक त्रासालाही शेतकऱ्यांना सामोरे जावे लागत आहे.
दरम्यान, शेतकऱ्यांनी महावितरण प्रशासनाकडे AG लाईनची तात्काळ तपासणी करून आवश्यक दुरुस्ती व देखभाल करावी, नियमित व सुरळीत वीजपुरवठा सुरू करावा तसेच भविष्यात अशा समस्या उद्भवू नयेत यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे.
या निवेदनाच्या प्रती तहसीलदार संग्रामपूर, उपविभागीय अधिकारी जळगाव जामोद तसेच तामगाव पोलीस स्टेशन येथेही देण्यात आल्या आहेत. काकनवाडा परिसरातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन त्वरित कार्यवाही करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही ग्रामस्थांकडून देण्यात येत आहे….



