कोथळी, मुक्ताईनगर येथे महाशिवरात्री निमित्त भव्य महाअभिषेक व यात्रोत्सव उत्साहात

मुक्ताईनगर प्रतिनिधी –
“हर हर महादेव”च्या जयघोषात पवित्र महाशिवरात्री निमित्त कोथळी (ता. मुक्ताईनगर) येथील जुने मुक्ताबाई मंदिरात महाअभिषेक, विधीवत पूजन व महाआरती उत्साहात पार पडली. या पावन सोहळ्यात सहपरिवार उपस्थित राहून भक्तिभावाने पूजा करण्याचा योग लाभल्याने वातावरण आध्यात्मिक उर्जेने भारले होते.
महाशिवरात्रीच्या औचित्याने मंदिर परिसरात भव्य यात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. पहाटेपासूनच भाविक भक्त, वारकरी संप्रदायातील अनुयायी आणि नागरिक मोठ्या संख्येने दर्शनासाठी दाखल झाले होते. मंदिरात मंत्रोच्चाराच्या गजरात महाअभिषेक करण्यात आला. त्यानंतर विधीवत पूजन व महाआरती पार पडली. संपूर्ण परिसर भक्तीमय वातावरणाने दुमदुमून गेला होता.
या मंगल प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी मतदारसंघातील सर्व बांधवांना आणि भाविक भक्तांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. तसेच आदिशक्ती मुक्ताबाईच्या चरणी सर्वांच्या सुख-समृद्धी, आनंद आणि शांततेसाठी प्रार्थना करण्यात आली.
“मतदारसंघात आनंद, शांती आणि समृद्धी नांदो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना,” असे सांगत भक्ती, श्रद्धा आणि एकतेचा संदेश यावेळी देण्यात आला.



