दहा वर्षांच्या पत्रकारिता प्रवासाला विराम; दैनिक साईमतप्रती अमोल वैद्य यांचे कृतज्ञ मनोगत

‘साईमतने दिली ओळख, मान-सन्मान आणि प्रेम’; प्रतिनिधीपदाचा निरोप घेताना अमोल वैद्य भावुक
संपादकीय सचिन झणके
मुक्ताईनगर : गेल्या दहा वर्षांपासून दैनिक साईमतचे प्रतिनिधी म्हणून कार्यरत असलेले अमोल वैद्य यांनी वैयक्तिक कारणांमुळे आपल्या कार्याला विराम देत दैनिक साईमत परिवाराबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे.
यावेळी त्यांनी आपल्या मनोगतात दैनिक साईमत हे केवळ वृत्तपत्र नसून निर्भीड आणि प्रभावी पत्रकारितेचे एक सक्षम व्यासपीठ असल्याचे नमूद केले. या वृत्तपत्रात प्रकाशित होणाऱ्या बातम्यांची दखल प्रशासनालाही घ्यावी लागते, हीच त्याच्या विश्वासार्हतेची खरी ओळख असल्याचे त्यांनी सांगितले.
दैनिक साईमतसोबतचा दहा वर्षांचा प्रवास हा आपल्या आयुष्यातील महत्त्वपूर्ण टप्पा असल्याचे सांगताना त्यांनी साईमत परिवाराने दिलेल्या मार्गदर्शन, सहकार्य आणि विश्वासाबद्दल विशेष कृतज्ञता व्यक्त केली. या माध्यमातूनच समाजात मान, सन्मान, ओळख आणि प्रेम मिळाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
वैयक्तिक कारणांमुळे सध्या कार्य थांबवत असलो तरी दैनिक साईमतप्रती असलेले प्रेम, आदर आणि आपुलकी कायम राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच वृत्तपत्राचे संपादक, व्यवस्थापन आणि संपूर्ण साईमत परिवाराचे मनःपूर्वक आभार मानत, त्यांच्या ऋणात सदैव राहणार असल्याचे त्यांनी आपल्या मनोगतात नमूद केले.
अमोल वैद्य यांच्या या भावनिक निरोपामुळे पत्रकारिता क्षेत्रातील त्यांच्या दशकभराच्या कार्याचा गौरव होत असून, दैनिक साईमत परिवाराशी असलेले त्यांचे जिव्हाळ्याचे नाते पुन्हा अधोरेखित झाले आहे.



