महाराष्ट्रसंपादकीय

निवडणूक आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी तात्काळ सुरू करा-जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे..

पुणे, दि. १६: लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाने जाहीर केला असून स्थानिक स्वराज्य संस्थांनी त्यांच्या परिसरात निवडणूक आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी तात्काळ सुरू करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे यांनी दिले.
आदर्श आचारसंहितेच्या अंमलबजावणीबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात दूरदृष्य प्रणालीद्वारे आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीस शिरुर लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी अजय मोरे, उप जिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर, उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे आदी उपस्थित होते.
डॉ.दिवसे म्हणाले, निवडणूक आदर्श आचारसंहिता लागू झाली असून ६ जूनपर्यंत ती लागू राहणार आहे. जिल्ह्यात दोन टप्प्यात मतदान होणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांनी शासकीय-निमशासकीय कार्यालये, सार्वजनिक ठिकाणी लावण्यात आलेले भित्तीपत्रक, झेंडे, कटआऊट्स, संदेश काढून त्याचा अहवाल २४ तासात सादर करावा. भिंतीवरील रंगविलेल्या जाहिरातीदेखील काढण्यात याव्यात.
शासकीय मैदाने, रस्ते, उद्याने, विद्युत खांब, खाजगी मालमत्तेवर परवानगी न घेता लावलेले भित्तीपत्रक किंवा संदेशही ४८ तासात काढण्यात यावेत. परवानगी न घेता खाजगी मालमत्तेवर जाहिरात केली असल्यास गुन्हे दाखल करण्यात यावेत. सर्वांनी काटेकोरपणे निवडणूक आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी करावी. ‘सी-व्हिजील’ ॲपवर आलेल्या तक्रारींसंदर्भात तातडीने कार्यवाही करावी, असे निर्देश त्यांनी दिले.
महानगरपालिका क्षेत्रात जाहिरात फलकावर राजकीय जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी सर्वांना समान संधी असावी व त्याबाबतचा करार झालेला असावा, त्याची खर्चात नोंद होणे आवश्यक आहे. निश्चित केलेली सभा ठिकाणी सर्व राजकीय पक्षांना सभा घेण्याची समान संधी देण्याबाबत संबंधित यंत्रणेमार्फत कार्यवाही करण्यात यावी. पक्षांनी परवानगी घेतलेल्या खाजगी वाहनाशिवाय इतर वाहनांवर जाहिरात करता येणार नाही. अशी वाहने आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, असेही जिल्हाधिकारी डॉ.दिवसे यांनी सांगितले.

निवडणूक यंत्रणेने गेल्या तीन महिन्यात मतदार नोंदणी आणि जनजागृतीसाठी चांगले परिश्रम घेतले आहेत. यापुढेही चांगली कामगिरी करून निवडणुका पारदर्शक आणि मुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी विशेष प्रयत्न करावे, असे आवाहन त्यांनी केले.
बैठकीला जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघातील सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, आदर्श आचारसंहिता समन्वयक अधिकारी उपस्थित होते.
निवडणूक आचारसंहिता भंगाच्या तक्रारीसाठी टोल फ्री क्रमांक,लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता भंगाच्या तक्रारीसाठी जिल्हा निवडणूक प्रशासनातर्फे टोल फ्री संपर्क क्रमांक उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.

भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असून निवडणूक आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी तात्काळ सुरू झाली आहे.नागरिकांना आचारसंहिता भंगाच्या तक्रारी करावयाच्या असल्यास त्यांनी १८००२३३०१०२ आणि १९५० टोल फ्री क्रमांकावर नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा.

या कक्षाद्वारे तातडीने तक्रारीची दखल घेण्यात येईल. हा कक्ष २४ तास सुरू राहणार असून त्यासाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नियंत्रण कक्षाला आलेल्या तक्रारीनुसार भरारी पथके आवश्यक कारवाई करतील, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे..!
धन्यवाद. ..

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button