लोकप्रिय आमदार अमोल दादा मिटकरी यांनी हिवरखेड नगरपरिषद साठी घेतली मुख्यमंत्रींची तातळीची भेट!,कोणत्याही क्षणी अस्तित्वात येऊ शकते हिवरखेड नगर परिषद!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस विजय घोडे तेल्हारा तालुका प्रतिनिधी
हिवरखेड दि.२१ :-
हिवरखेड नगरपरिषद संदर्भात दि.२० फेब्रुवारी रोजी लोकप्रिय आ. अमोलदादा मिटकरी यांनी मा. मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब यांची मा. मंत्री धनंजयजी मुंडे, मा.अब्दुल सत्तार इत्यादी मान्यवरांसोबत भेट घेऊन अंतिम अधीसूचना काढण्याची मागणी केली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी सचिवांना तात्काळ कारवाई करण्याबाबत निर्देश दिले. त्यामुळे हिवरखेड वासियांचे स्वप्न लवकरच साकार होणार असल्याचे दिसते.
तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड ग्राम-पंचायत ही नगरपंचायत किंवा नगरपरिषद व्हावी यासाठी तब्बल २५ वर्षांपासून नागरिकांचा शांततामय मार्गाने अविरत संघर्ष सुरू आहे. विदर्भातील सर्वात मोठी असलेली हिवरखेड ग्रामपंचायतीच्या बाबतीत सर्व प्रक्रिया पूर्ण होऊनही शासन जाणीवपूर्वक नगरपरिषद ची अंतिम अधिसूचना काढण्यास विलंब करीत होते. यासाठी आतापर्यंत अनेक आंदोलने, आमरण उपोषणे, अन्नत्याग आंदोलन, निदर्शने, प्रदर्शने, इच्छामृत्यू परवानगी, आत्मदहन इशारा, मूक मोर्चा, मुंडण आंदोलन, बाजारपेठ बंद, रक्तसंकल्प अभियान, अशी अनेक प्रकारची आंदोलने झाली. एवढेच नव्हे तर हिवरखेड वासीयांनी आपल्या रक्ताने मुख्यमंत्र्यांना व संबंधितांना पत्रे सुद्धा लिहिली होती. त्याची दखल घेत शासनाने तात्काळ हिवरखेड नगरपंचायतची उद्घोषणा केली होती. परंतु त्यानंतर ज्यांना हिवरखेड नगरपंचायत नको होती त्या व्यक्तींनी हिवरखेड नगरपंचायत वर स्थगिती आणण्यात यश मिळविले होते. त्यानंतरही हिवरखेडच्या नागरिकांनी लोकप्रतिनिधींकडे पाठपुरावा सुरूच ठेवला. लोकांच्या मागणीची दखल घेत आमदार अमोल मिटकरी यांनी याविषयी अनेकदा विधिमंडळात आवाज उचलला तसेच आमदार भारसाकडे यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांना नगरपरिषद करण्याबाबत पत्र दिले होते. सामूहिक पाठपुराव्यानंतर हिवरखेड नगर परिषद ची उद्घोषणा सुद्धा शासनाने केली. त्यासाठी सर्व प्रक्रिया पूर्ण केलेली असून जिल्हाधिकारी व संबंधित लोकप्रतिनिधींची ना हरकत सुद्धा शासनाला दिलेली आहे. परंतु त्याला मोठा कालावधी उलटून गेला असतानाही शासनाची कुंभकर्णी झोप उघडत नसल्यामुळे शासनाला जागे करण्यासाठी आणि हिवरखेड नगरपरिषदची अंतिम अधिसूचना काढण्याच्या मागणीसाठी हिवरखेड वासियांच्या रक्ताच्या धारा पुन्हा वाहणार असल्याची चर्चा होती. यासाठी हिवरखेडच्या जागरूक नागरिकांतर्फे हिवरखेड विकास मंच, अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ, आणि विविध सामाजिक संघटनांमार्फत शासनाला गांधीगिरी मार्गाने संदेश देण्यासाठी हिवरखेड वासियांच्या स्वतःच्या रक्ताने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, संबंधित मंत्री, संबंधित प्रशासकीय अधिकारी, व इतर वरिष्ठांना रक्तरंजित पत्र लिहिण्याचा मानस महात्मा गांधीजींच्या पुण्यतिथीच्या दिवशी हिवरखेड नगरपंचायत/ नगरपरिषद समर्थकांनी बोलून दाखविला होता.
नगरपरिषद साठी रक्ताने पत्र लिहिण्याची निवेदने जागरूक नागरिकांनी हिवरखेड विकास मंच, अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघा मार्फत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री, प्रधान सचिव नगर विकास विभाग, ग्राम विकास विभाग, अकोला जिल्हाधिकारी, सर्व संबंधित अधिकारी इत्यादींना पाठविले होते. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. वरिष्ठ स्तरावर अंतिम अधिसूचना काढण्यासाठी हालचाली सुरु झाल्या. मुख्यमंत्री व नगर विकास मंत्री एकनाथजी शिंदे यांची महत्वाची सही सुद्धा या फाईलवर झाली. आणि आता अंतिम अधिसूचना तयार झालेली असून तांत्रिक व कायदेशीर बाबी तपासण्यासाठी सदर अंतिम अधिसूचना विधी व न्याय विभागात पाठविण्यात आली असल्याची गोपनीय माहिती मिळाली आहे. विधी व न्याय विभागाकडून अधिसूचनेला हिरवी झेंडी मिळताच कोणत्याही क्षणी नगर विकास मंत्रालयाचे उपसचिव नगरपरिषदेची अंतिम अधिसूचना जाहीर करतील. आणि नागरिकांच्या या सामूहिक संघर्षाला यश येईल.



