उंबरखेड फाट्याजवळ भीषण अपघात; २४ वर्षीय वैष्णवी घुगे यांचा मृत्यू

एमबीएचे शिक्षण घेणाऱ्या वैष्णवींची स्वप्ने अधुरी; दोन गंभीर जखमींना जालन्याला हलविले, देऊळगाव राजा परिसरात हळहळ
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी – शंकर शिवरकर
देऊळगाव राजा : चिखलीहून देऊळगाव राजा येथे येत असलेल्या स्विफ्ट डिझायर कारला उंबरखेड फाट्याजवळील एचपी पेट्रोल पंप परिसरात अपघात झाला. या अपघातात देऊळगाव राजा येथील २४ वर्षीय वैष्णवी बद्रीनाथ घुगे यांचा मृत्यू झाला. अपघातात गंभीर जखमी झालेल्या दोघांना पुढील उपचारासाठी जालन्याला हलविण्यात आले, तर अन्य जखमींवर उपचार सुरू असल्याची माहिती आहे. रविवार, १८ ऑक्टोबर रोजी दुपारी साडेबारा ते एक वाजताच्या सुमारास ही घटना घडली.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, एमएच २८ बीके ८७१८ क्रमांकाची स्विफ्ट डिझायर कार चिखलीकडून देऊळगाव राजाकडे येत होती. उंबरखेड फाट्याजवळील एचपी पेट्रोल पंप परिसरात कार दुभाजकावर आदळून नगरपालिकेच्या विद्युत खांबाला धडकली. अपघाताच्या वेळी कारमध्ये पाच महिला आणि दोन पुरुष असे एकूण सात जण प्रवास करीत होते. अपघात नेमका कशामुळे झाला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
या अपघातात वैष्णवी घुगे यांच्या डोक्याला व इतर ठिकाणी गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने देऊळगाव राजा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. अपघातातील अन्य दोन गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी जालन्याला हलविण्यात आले. इतर जखमींवरही उपचार सुरू असल्याची माहिती आहे.
वैष्णवी या शिक्षक बद्रीनाथ घुगे यांच्या कन्या असून, देऊळगाव राजा येथील भगवान बाबा कॉलनीतील रहिवासी होत्या. त्या एमबीएचे शिक्षण घेत होत्या. उच्च शिक्षण पूर्ण करून उज्ज्वल भविष्य घडविण्याची स्वप्ने पाहणाऱ्या वैष्णवी यांचा प्रवास अवघ्या २४व्या वर्षी थांबला. त्यांच्या अकाली निधनाने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
शिक्षण, करिअर आणि भविष्याबाबत अनेक स्वप्ने मनात बाळगणाऱ्या वैष्णवी यांच्या निधनाने घुगे कुटुंबीयांच्या आनंदावर दुःखाचे सावट पसरले आहे. एका तरुणीचे आयुष्य असे अचानक संपल्याने देऊळगाव राजा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
दरम्यान, वृत्त लिहिपर्यंत या अपघाताची पोलीस ठाण्यात नोंद झाल्याची अधिकृत माहिती उपलब्ध झाली नव्हती. अपघाताचे नेमके कारण आणि जखमींची प्रकृती याबाबत अधिकृत माहिती मिळाल्यानंतरच स्पष्टता येणार आहे.



