बुलडाणा अर्बनची यशोगाथा आता विशेष टपाल आवरणावर

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी – शंकर शिवरकर
बुलढाणा, दि. 5 : बुलडाणा अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष राधेश्यामजी चांडक यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त तसेच बुलडाणा अर्बनच्या ४० वर्षांच्या यशस्वी वाटचालीच्या गौरवार्थ भारतीय डाक विभागाच्या वतीने विशेष टपाल आवरणाचे अनावरण करण्यात आले.
बुलडाणा अर्बन येथील गोवर्धन हॉलमध्ये झालेल्या या सोहळ्याला बुलडाणा अर्बनचे अध्यक्ष डॉ. सुकेशजी झंवर, उपाध्यक्ष श्री. विनोदजी केडिया, संचालक गोपाल चिरानिया, नागपूर क्षेत्राचे सहाय्यक निदेशक डाक सेवा जयंत दाऊ, बुलडाणा विभागाचे अधीक्षक डाकघर गजेंद्र जाधव यांच्यासह पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
सन १९८६ मध्ये केवळ १२ हजार रुपये प्रारंभिक भांडवल आणि ७२ सभासदांच्या सहभागातून सुरू झालेल्या बुलडाणा अर्बनने चार दशकांत व्यापक विस्तार साधला आहे. आज संस्थेचे चार राज्यांत ४८३ शाखांचे जाळे असून ४१० गोदामांची व्यवस्थाही आहे. आर्थिक क्षेत्रातील कार्यासोबतच सामाजिक बांधिलकी जपत संस्थेने तिरुपती, अयोध्या, माहूरगड, शिर्डी, पंढरपूर आणि तुळजापूर येथे भक्तनिवास उभारले आहेत.
भारतीय डाक विभागाच्या फिलाटेली परंपरेत विशेष टपाल आवरणाला महत्त्वाचे स्थान आहे. महत्त्वपूर्ण व्यक्ती, संस्था अथवा विशेष प्रसंगाच्या स्मृती जतन करण्यासाठी विशेष टपाल आवरण जारी केले जाते. बुलडाणा अर्बनच्या ४० वर्षांच्या वाटचालीच्या निमित्ताने जारी करण्यात आलेले हे आवरण संस्थेच्या ऐतिहासिक प्रवासासह संस्थापक अध्यक्ष राधेश्यामजी चांडक यांच्या योगदानाची नोंद करणारे ठरणार आहे.
यावेळी भारतीय डाक विभागाच्या वतीने बुलडाणा अर्बनच्या चार दशकांच्या यशस्वी वाटचालीचे अभिनंदन करण्यात आले. सामाजिक बांधिलकी, ग्राहकांशी सातत्यपूर्ण संवाद आणि विश्वास या मूल्यांच्या आधारावर संस्थेने निर्माण केलेली स्वतंत्र ओळख उल्लेखनीय असल्याचे मान्यवरांनी नमूद केले.
राधेश्यामजी चांडक यांच्या ७५व्या वाढदिवसानिमित्त उपस्थित मान्यवरांनी त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. त्यांच्या दीर्घ, निरोगी व यशस्वी आयुष्यासाठी तसेच त्यांच्या मार्गदर्शनाखाली बुलडाणा अर्बनची पुढील वाटचाल अधिक यशस्वी होण्यासाठी शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या.
बुलडाणा अर्बनच्या चार दशकांच्या प्रवासाची भारतीय डाक विभागाच्या फिलाटेली परंपरेत विशेष टपाल आवरणाच्या माध्यमातून नोंद होणे ही संस्था तसेच बुलडाणा जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब ठरली आहे. या विशेष आवरणाच्या माध्यमातून बुलडाणा अर्बनची यशोगाथा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचणार असून, हा सोहळा संस्थेच्या इतिहासातील संस्मरणीय क्षण ठरला.



