बॉक्सिंगमध्ये निष्कर्ष जाधवची राज्यस्तराकडे वाटचाल

अकोला विभागीय स्पर्धेत कांस्यपदक; जिल्हास्तरावर मिळवले होते सुवर्णपदक
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी – शंकर शिवरकर
देऊळगाव राजा : देऊळगाव राजा हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयाचा इयत्ता सहावी ‘क’चा विद्यार्थी निष्कर्ष निलेश जाधव याने बॉक्सिंगमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी नोंदवत राज्यस्तरीय स्पर्धेत प्रवेश मिळविला आहे. अकोला येथे झालेल्या विभागीय शालेय बॉक्सिंग स्पर्धेत त्याने कांस्यपदकाची कमाई केली.
१ व २ ऑक्टोबर रोजी झालेल्या या विभागीय स्पर्धेत निष्कर्षने विविध सामन्यांत आपले कौशल्य दाखविले. त्याच्या कामगिरीमुळे राज्यस्तरीय शालेय बॉक्सिंग स्पर्धेसाठी त्याची निवड झाली. याआधी २६ सप्टेंबर रोजी झालेल्या जिल्हास्तरीय स्पर्धेत निष्कर्षने सुवर्णपदक पटकावले होते.
या क्रीडा प्रवासात प्रशिक्षक अजय म्हस्के तसेच शाळेतील क्रीडा शिक्षकांचे मार्गदर्शन त्याला मिळाले. मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक, वर्गशिक्षक आणि इतर शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनीही त्याला प्रोत्साहन दिले.
निष्कर्षच्या विभागीय स्पर्धेतील कामगिरीनंतर शाळेतील विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांनी त्याचे अभिनंदन केले. आता राज्यस्तरीय स्पर्धेतही चांगली कामगिरी करण्यासाठी त्याच्याकडून अपेक्षा व्यक्त होत आहेत.



