ग्रामपंचायत अधिकारी मांगो साळुंखे निलंबित; सरोळ ग्रामपंचायतीतील तक्रारींची दखल

मुक्ताईनगर : जळगाव जिल्हा परिषदेअंतर्गत मुक्ताईनगर तालुक्यातील सरोळ ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत अधिकारी श्री. मांगो साळुंके यांच्याविरुद्ध ग्रामपंचायत स्तरावर मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त झाल्यानंतर प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. प्राप्त तक्रारी, सादर अहवाल आणि उपलब्ध कागदपत्रांच्या आधारे मांगो साळुंके यांना जिल्हा परिषद सेवेतून निलंबित करण्यात आले आहे.
प्राप्त माहितीनुसार, ग्रामस्थांशी असभ्य वर्तनाची भाषा वापरणे तसेच शासकीय कामकाजात अडथळा निर्माण होईल अशा प्रकारचे वर्तन केल्याचे तक्रारींमध्ये नमूद करण्यात आले होते. याशिवाय वरिष्ठ अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांशी गैरवर्तन केल्याबाबतही तक्रारी करण्यात आल्या होत्या.
या प्रकरणाची दखल घेत गटविकास अधिकारी, पंचायत समिती मुक्ताईनगर यांनी संबंधित अहवाल वरिष्ठ प्रशासनाकडे सादर केला. त्यानंतर प्राप्त अहवाल व उपलब्ध कागदपत्रांच्या आधारे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद जळगाव यांनी महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा (शिस्त व अपील) नियम, १९६४ मधील तरतुदीनुसार कारवाई केली.
या कारवाईनुसार ग्रामपंचायत अधिकारी श्री.मांगो साळुंखे यांना आदेशाच्या दिनांकापासून जिल्हा परिषद सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. निलंबन कालावधीत त्यांचे मुख्यालय पंचायत समिती, चाळीसगाव येथे निश्चित करण्यात आले आहे.
ग्रामपंचायत पातळीवरील तक्रारींची प्रशासनाने गंभीर दखल घेतल्याने शासकीय कामकाजातील शिस्त, अधिकारी-कर्मचारी व ग्रामस्थांशी असलेले वर्तन आणि प्रशासनाच्या जबाबदारीचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. पुढील काळात या प्रकरणाच्या अनुषंगाने आणखी काही प्रशासकीय बाबी समोर येतात का, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.



