रावेर शहरात २५ सप्टेंबरला आठवडे बाजार बंद

गणपती विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हादंडाधिकाऱ्यांचा आदेश; वाहतूक कोंडी व कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी निर्णय
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
आवाज न्यायाचा
रावेर ता. प्रतिनिधी – विकास आमोदकर
रावेर शहरातील आठवडे बाजाराबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. शुक्रवार, दि. २५ सप्टेंबर २०२६ रोजी रावेर नगरपरिषद हद्दीतील आठवडे बाजार बंद ठेवण्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी कार्यालय, जळगाव यांच्याकडून देण्यात आले आहेत.
प्रशासनाच्या आदेशानुसार, २५ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी निमित्त श्री गणपती विसर्जन मिरवणूक आयोजित करण्यात आली आहे. या मिरवणुकीत मोठ्या प्रमाणात नागरिक सहभागी होण्याची शक्यता असून, शहरातील विविध ठिकाणी गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात येणार आहे.
त्याच दिवशी आठवडे बाजार भरल्यास नागरिकांची मोठी गर्दी होऊन वाहतूक कोंडी तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी आणि विसर्जन मिरवणूक शांततेत पार पाडण्यासाठी आठवडे बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
हा आदेश तहसीलदार, रावेर आणि पोलीस निरीक्षक, रावेर पोलीस स्टेशन यांच्या पत्रव्यवहाराच्या आधारे काढण्यात आला आहे. मुंबई मार्केट अँड फेअर्स अॅक्ट, १८६२ मधील संबंधित तरतुदींनुसार जिल्हादंडाधिकाऱ्यांना प्राप्त अधिकारांचा वापर करून हा आदेश जारी करण्यात आला आहे.
प्रशासनाचे आवाहन
गणपती विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे आणि कायदा-सुव्यवस्था व वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
विशेष सूचना : शुक्रवार, २५ सप्टेंबर रोजी रावेरचा आठवडे बाजार भरणार नाही.



