मुक्ताईनगरजवळ काळाचा घाला! डंपरच्या धडकेत अजंदेच्या प्रल्हाद हिवरे यांचा मृत्यू

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रे.
प्रमोद सौंदडे
नायगाव फाट्याजवळ भीषण अपघात; एकाचा जागीच मृत्यू, दुसरा गंभीर जखमी; संतप्त जमावाकडून डंपरची तोडफोड
मुक्ताईनगर तालुक्यातील नायगाव फाट्याजवळ सोमवारी सायंकाळी सुमारे ६ वाजेच्या दरम्यान सिमेंट-काँक्रीट मिक्सर डंपर आणि दुचाकीची भीषण धडक झाली. या अपघातात रावेर तालुक्यातील अजंदे येथील प्रल्हाद मधुकर हिवरे (वय ४०) यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांच्यासोबत असलेले ईश्वर नामदेव पवार (वय ३८) हे गंभीर जखमी झाले.
प्रल्हाद हिवरे व ईश्वर पवार हे दोघे दुचाकी क्रमांक एमएच १९ डीडी १८५८ वरून मलकापूर येथून अजंदे गावाकडे जात होते. नायगाव फाट्याजवळ इंदूर-हैदराबाद महामार्ग क्रमांक ७५३ च्या कामासाठी वापरण्यात येणाऱ्या बीएनए कंपनीच्या डंपर क्रमांक एमएच १९ सीवाय ४६१७ ने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक एवढी भीषण होती की, प्रल्हाद हिवरे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
अपघातात गंभीर जखमी झालेल्या ईश्वर पवार यांना तातडीने मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
संतप्त जमावाकडून डंपरची तोडफोड
अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली. अपघातामुळे संतप्त झालेल्या जमावाने डंपरची तोडफोड केली. परिस्थितीची माहिती मिळताच मुक्ताईनगरचे पोलीस निरीक्षक आशिष अडसूळ हे पोलीस पथकासह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत डंपर चालकाला ताब्यात घेतले.
डंपर चालक गुड्डू नंदकिशोर राम (वय ३०, रा. झारखंड) याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.
दरम्यान, फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळी पाहणी करून आवश्यक पुरावे संकलित केले. मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. या भीषण अपघातामुळे अजंदे गावासह परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांकडून हळहळ व्यक्त होत आहे.



