सेंट पॉल अकॅडमी हिवरखेड येथे तुलसीदास जयंती उत्साहात साजरी

हिवरखेड : सेंट पॉल अकॅडमी, हिवरखेड येथे हिंदी साहित्याचे महान कवी व रामचरितमानसचे रचनाकार गोस्वामी तुलसीदास यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. विद्यार्थ्यांमध्ये भारतीय संस्कृती, रामचरितमानसातील मूल्ये आणि संत साहित्याची ओळख निर्माण व्हावी, या उद्देशाने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक चंद्रकांत तिवारी होते. यावेळी विद्यार्थ्यांनी रामचरितमानसमधील विविध श्लोकांचे प्रभावी सादरीकरण करून त्यांचे अर्थही समजावून सांगितले. विद्यार्थ्यांच्या ओघवत्या वाणीतील श्लोकपठण आणि अर्थस्पष्टीकरणाला उपस्थितांकडून उत्स्फूर्त दाद मिळाली.
कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे रामचरितमानसावर आधारित सादर करण्यात आलेली सुंदर नाटिका. विद्यार्थ्यांनी आपल्या अभिनयातून रामायणातील प्रसंग जिवंत करत संस्कार, सत्य, कर्तव्य, त्याग आणि आदर्श जीवनमूल्यांचा संदेश दिला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पूर्वा वानखडे आणि दीक्षित टावरी यांनी प्रभावीपणे केले. विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग आणि सादरीकरणामुळे तुलसीदास जयंतीचा कार्यक्रम ज्ञानवर्धक तसेच संस्कारक्षम ठरला.



