आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या आदेशांची अंमलबजावणी होत आहे का?; मुक्ताईनगरातील कारवाईवर प्रश्नचिन्ह

मुक्ताईनगरातील अन्न सुरक्षा कारवाई थंडावली?; नमुने घेतल्यानंतरही पुढील कार्यवाहीचा पत्ता नाही, नागरिकांमध्ये चर्चा
मुक्ताईनगर | प्रतिनिधी
मुक्ताईनगर शहरात काही दिवसांपूर्वी जिल्हा अन्न व औषध प्रशासन विभागाने दूध संकलन केंद्रे, दुग्धजन्य पदार्थ विक्री केंद्रे तसेच काही खाद्यपदार्थ व शीतपेय विक्रेत्यांकडून तपासणी करून नमुने (सॅम्पल) घेतले होते. मात्र या कारवाईला सुमारे दोन महिने उलटूनही संबंधित तपासणीचा अहवाल, नोटीस किंवा पुढील कारवाईबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नसल्याने नागरिकांमध्ये विविध चर्चांना उधाण आले आहे.
नागरिकांच्या म्हणण्यानुसार, सार्वजनिक आरोग्याशी संबंधित विषयांमध्ये पारदर्शकता आवश्यक असताना तपासणीचे निष्कर्ष जाहीर करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे संबंधित नमुन्यांचा अहवाल काय आला, दोषी आढळल्यास कोणावर कारवाई झाली का, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
राज्याचे अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अन्नसुरक्षेबाबत कठोर भूमिका घेत विविध ठिकाणी प्रभावी कारवाईचे निर्देश दिले आहेत. मात्र मुक्ताईनगरातील कारवाईनंतर पुढील हालचाल दिसून न आल्याने या निर्देशांची प्रभावी अंमलबजावणी होत आहे का, असा सवाल काही सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
यासंदर्भात काही नागरिकांकडून कारवाईचा तपशील जाहीर न होण्यामागे आर्थिक देवाणघेवाण झाल्याचा आरोपही केला जात आहे. मात्र या आरोपांना अद्याप कोणताही अधिकृत पुरावा समोर आलेला नाही आणि संबंधित विभागाकडूनही याबाबत कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही.
या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून तपासणी अहवाल सार्वजनिक करावा, दोषी आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कारवाई करावी आणि नागरिकांमधील संभ्रम दूर करावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
(टीप : या वृत्तातील काही मुद्दे हे नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांकडून करण्यात आलेले आरोप व प्रश्न आहेत. त्यासंदर्भात संबंधित विभागाची अधिकृत भूमिका अद्याप प्राप्त झालेली नाही.)



