देऊळगाव राजा नगर परिषदेत टेंडर घोटाळ्याचा संशय? मुदत संपल्यानंतरही प्रक्रिया सुरू

देऊळगाव राजा प्रतिनिधी :– शंकर शिवरकर
ठेवण्यावरशिवाजी मेहेत्रे नगरसेवकांची आक्षेपार्ह तक्रारटेंडर उघडण्याची मुदत संपली, तरी प्रक्रिया रद्द न केल्याचा आरोप; चौकशी करून नव्याने निविदा काढण्याची मागणी
देऊळगाव राजा नगर परिषदेमधील विविध विभागांच्या वार्षिक दर करार निविदा प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, टेंडर उघडण्याची मुदत संपल्यानंतरही संबंधित प्रक्रिया सुरू ठेवण्यात येत असल्याचा गंभीर आरोप नगरसेवक शिवाजी हरिभाऊ मेहेत्रे यांनी केला आहे. याबाबत त्यांनी मुख्याधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार दाखल करून संपूर्ण प्रक्रिया रद्द करून नव्याने निविदा मागविण्याची मागणी केली आहे.
नगरसेवक मेहेत्रे यांनी दिलेल्या निवेदनानुसार, नगर परिषदेमार्फत विद्युत विभाग, आरोग्य विभाग, पाणीपुरवठा विभाग तसेच विविध विकासकामांसाठी वार्षिक दर करार निविदा प्रक्रिया राबविण्यात आली होती. या निविदांसाठी 20 मे 2026 ही अंतिम मुदत निश्चित करण्यात आली होती. मात्र, निविदा सादर करण्याची व टेंडर उघडण्याची मुदत संपूनही संबंधित टेंडर नियोजित वेळेत उघडण्यात आले नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.
तक्रारीत नमूद करण्यात आले आहे की, निविदा प्रक्रियेत पारदर्शकता, स्पर्धात्मकता आणि शासन नियमांचे पालन होणे अत्यावश्यक आहे. टेंडर उघडण्याची निश्चित मुदत संपल्यानंतरही प्रक्रिया सुरू ठेवणे हे नियमबाह्य ठरू शकते. त्यामुळे निविदा प्रक्रियेच्या निष्पक्षतेवर संशय निर्माण होऊन इच्छुक कंत्राटदारांमध्ये असंतोष निर्माण होण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
नगरसेवक मेहेत्रे यांनी मुख्याधिकाऱ्यांना सादर केलेल्या दि.15जून रोजीच्या पत्रात संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसेच मुदत संपलेल्या निविदा प्रक्रिया तत्काळ रद्द करून शासन नियमांनुसार नव्याने निविदा मागविण्यात याव्यात, अशी मागणी त्यांनी केली आहे. याशिवाय या प्रकरणात जर काही त्रुटी अथवा निष्काळजीपणा आढळून आला तर जबाबदार अधिकाऱ्यांवर योग्य ती प्रशासकीय कारवाई करण्यात यावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.
या तक्रारीमुळे नगर परिषदेच्या कामकाजाबाबत नवा वाद निर्माण झाला असून, प्रशासन यावर काय भूमिका घेते याकडे कंत्राटदार, लोकप्रतिनिधी आणि नागरिकांचे लक्ष लागले आहे. निविदा प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी प्रशासन कोणती पावले उचलते, हे आगामी काळात स्पष्ट होणार आहे.
विशेष……
20 मे 2026 रोजी टेंडर उघडण्याची मुदत संपल्याचा दावा.
मुदतीनंतरही निविदा प्रक्रिया सुरू असल्याचा आरोप.
नगरसेवक शिवाजी मेहेत्रे यांची मुख्याधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार.
संपूर्ण प्रक्रिया रद्द करून नव्याने निविदा मागविण्याची मागणी.
जबाबदार अधिकाऱ्यांवर चौकशी व कारवाईचीही मागणी.
चौकट. “टेंडर प्रक्रियेत पारदर्शकतेचा अभाव? देऊळगाव राजा नगर परिषदेत निविदांवरून नवा वाद”



