जळगावा जिल्हाबुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

रविकांत तुपकरांची प्रकृती चिंताजनक; पाच दिवसांच्या अन्नत्यागानंतर छत्रपती संभाजीनगर येथे उपचार सुरू

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
चिखली प्रतिनिधी:- सलमान पठाण

दिनांक, २१/०६/२०२६
शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसह विविध प्रलंबित मागण्यांसाठी सलग पाच दिवस केलेल्या अन्नत्याग आंदोलनाचा गंभीर परिणाम शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या प्रकृतीवर झाला असून, त्यांना पुढील उपचारांसाठी मध्यरात्री छत्रपती संभाजीनगर येथे हलविण्यात आले आहे. शरीरात संसर्ग वाढल्याने तसेच रक्तातील साखरेची पातळी अद्याप सामान्य न झाल्याने निर्माण झालेल्या वैद्यकीय गुंतागुंतीमुळे तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

कर्जमुक्ती, सोयाबीन व कापूस उत्पादकांना आर्थिक मदत, शेतमालाला हमीभाव आणि इतर शेतकरीहिताच्या मागण्यांसाठी रविकांत तुपकर यांनी १५ जूनपासून बुलढाण्यात बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू केले होते. आंदोलनाच्या प्रत्येक दिवसागणिक त्यांच्या प्रकृतीत बिघाड होत गेला. रक्तातील साखरेचे प्रमाण धोकादायक पातळीपर्यंत घसरल्याने डॉक्टरांनी वारंवार इशारा दिला होता. तसेच किडनीवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. मात्र, अन्नाचा कणही घेणार नसल्याच्या निर्धारामुळे त्यांची प्रकृती आणखी खालावत गेली.
दरम्यान, राज्यभरातील शेतकऱ्यांनी तुपकर यांच्या आंदोलनाला मोठा पाठिंबा दर्शविला. विविध ठिकाणी रास्तारोको, निषेध मोर्चे आणि आंदोलनांच्या माध्यमातून सरकारविरोधात संताप व्यक्त करण्यात आला. वाढता जनक्षोभ लक्षात घेऊन राज्य सरकारने मध्यस्थीची भूमिका घेतली. मंत्री गिरीश महाजन यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन तुपकर यांच्याशी चर्चा केली आणि मागण्यांवर सकारात्मक निर्णयासाठी चार दिवसांचा अवधी मागितला.
सरकारच्या विनंतीचा मान राखत रविकांत तुपकर यांनी अन्नत्याग आंदोलन तात्पुरते स्थगित केले. त्यानंतर त्यांना बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, पाच दिवसांच्या अन्नत्यागामुळे निर्माण झालेल्या गंभीर वैद्यकीय गुंतागुंतींमुळे प्रकृतीत अपेक्षित सुधारणा न झाल्याने त्यांना पुढील उपचारांसाठी छत्रपती संभाजीनगर येथे हलविण्यात आले.
वैद्यकीय सूत्रांच्या माहितीनुसार, त्यांच्या शरीरातील ‘किटोन’चे प्रमाण वाढल्याने ‘डायबेटिक केटोॲसिडोसिस’चा धोका निर्माण झाला आहे. तसेच किडनीच्या कार्यक्षमतेवर परिणाम झाल्याची चिन्हे दिसून येत असून शरीरातील इतर महत्त्वाच्या अवयवांवरही ताण पडल्याचे डॉक्टरांनी सांगितले. वाढलेल्या संसर्गामुळे परिस्थिती अधिक चिंताजनक बनली असून तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक त्यांच्या प्रकृतीवर सातत्याने लक्ष ठेवून आहे.

सरकारने मागितलेल्या चार दिवसांच्या मुदतीत शेतकरी प्रश्नांवर ठोस निर्णय घेतला जातो की नाही, याकडे राज्यभरातील शेतकरी व तुपकर समर्थकांचे लक्ष लागले आहे. आंदोलन स्थगित झाले असले तरी शेतकरी प्रश्नांवरील संघर्ष अद्याप कायम असल्याची भावना समर्थकांमध्ये व्यक्त होत आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button