विश्व बौद्ध संघ स्थापना दिन : बुद्ध विचारांच्या जागतिक प्रसाराचा ऐतिहासिक प्रवास

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी
२५ मे १९५० च्या परिषदेत बाबासाहेबांनी मांडले बौद्ध धर्माच्या पुनरुज्जीवनाचे महत्त्वपूर्ण मुद्दे
बौद्ध ऐक्याचा जागतिक मंच : विश्व बौद्ध संघाच्या स्थापनेला ७६ वर्षे पूर्ण
विविध बौद्ध विचारधारांना एकत्र आणणारी ऐतिहासिक परिषद ठरली मैलाचा दगड
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी गाजली जागतिक बौद्ध परिषद
मानवता, शांतता आणि बुद्ध तत्वज्ञानाच्या प्रसारासाठी विश्व बौद्ध संघाचे योगदान उल्लेखनीय
२५ मे १९५० हा दिवस जागतिक बौद्ध इतिहासात अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. याच दिवशी श्रीलंकेत आयोजित करण्यात आलेल्या ऐतिहासिक जागतिक बौद्ध धर्म परिषदेत ‘विश्व बौद्ध संघ’ या जागतिक संघटनेची स्थापना करण्यात आली. बौद्ध धर्मातील विविध विचारधारांना एका व्यासपीठावर आणणारी ही परिषद जागतिक बौद्ध चळवळीच्या दृष्टीने ऐतिहासिक ठरली.
पाली भाषेचे अभ्यासक, बौद्ध धर्माचे विद्वान आणि विविध देशांमध्ये श्रीलंकेचे राजदूत म्हणून कार्य केलेले प्रा. डॉ. गुणापाला पियासेना मलालसेकेरा यांच्या पुढाकारातून ही परिषद आयोजित करण्यात आली होती. आशिया, युरोप आणि अमेरिका खंडातील तब्बल १२९ देशांचे प्रतिनिधी या परिषदेत सहभागी झाले होते. विशेष म्हणजे, कायदामंत्री डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनाही या परिषदेस विशेष निमंत्रण देण्यात आले होते. त्यांच्या समवेत माई आंबेडकर आणि पां. ना. राजभोज उपस्थित होते.
थेरवाद, महायान आणि वज्रयान या विविध बौद्ध विचारधारांचे प्रमुख प्रथमच एका मंचावर आले होते. विविध मतप्रवाह असूनही बौद्ध धर्माच्या मूलभूत मूल्यांवर एकमत निर्माण करणे, हे या परिषदेचे सर्वात मोठे यश मानले जाते.
या परिषदेत सी. बी. नुगावाला यांनी ‘विश्व बौद्ध संघ’ स्थापनेचा ठराव मांडला. इंग्लंड, ब्रह्मदेश, जपान, इटली, थायलंड आणि बंगालमधील प्रतिनिधींनी या ठरावाला अनुमोदन दिले. बुद्ध विचारांचे पालन, बौद्धांमध्ये एकता निर्माण करणे, बुद्ध तत्वज्ञानाचा प्रचार-प्रसार, सामाजिक-सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन आणि जागतिक शांतता व मानवतेसाठी कार्य करणे, ही संघटनेची प्रमुख उद्दिष्टे निश्चित करण्यात आली.
संस्थेचे पहिले अध्यक्ष म्हणून प्रा. डॉ. गुणापाला पियासेना मलालसेकेरा यांची घोषणा करण्यात आली. आज ही संस्था जगातील ३५ देशांमध्ये कार्यरत असून तिचे मुख्यालय थायलंड येथे आहे. संयुक्त राष्ट्र संघाच्या आर्थिक व सामाजिक परिषदेशी संलग्न असलेली ही संस्था युनेस्कोसोबतही कार्यरत आहे.
परिषदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्माच्या मूळ स्वरूपाबाबत अत्यंत महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले. भारतात बौद्ध धर्माचे आचार-विचार दिसत नाहीत, मूळ तत्वांपासून दूर गेलेल्या श्रद्धांचा प्रभाव वाढत आहे आणि बौद्ध धर्म खऱ्या अर्थाने जिवंत आहे का, याचा शोध घेण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. बाबासाहेबांनी मांडलेले हे विचार आजही बौद्ध धर्माच्या प्रचार-प्रसारासाठी कार्य करणाऱ्या संघटनांसाठी मार्गदर्शक ठरत आहेत.
मानवता, शांतता आणि समतेचा संदेश देणाऱ्या विश्व बौद्ध संघाच्या कार्याला आजही जागतिक स्तरावर मोठे महत्त्व प्राप्त असून, बुद्ध तत्वज्ञानाच्या माध्यमातून जगाला एकत्र आणण्याचे कार्य ही संस्था सातत्याने करत आहे.



