मुक्ताईनगरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात; विविध मान्यवरांकडून अभिवादन, रॅलींनी शहर दुमदुमले

मुक्ताईनगर प्रतिनिधी :
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मुक्ताईनगर शहरात उत्साहपूर्ण वातावरणात अभिवादन कार्यक्रम पार पडले. प्रवर्तक चौक येथे सकाळपासूनच अनुयायी, सामाजिक कार्यकर्ते व विविध राजकीय पक्षांच्या मान्यवरांची मोठी उपस्थिती दिसून आली.
समता सैनिक दल व भारतीय बौद्ध महासभा यांच्या वतीने सकाळी ११ वाजता महामानवांना मानवंदना अर्पण करण्यात आली. यावेळी सेवानिवृत्त सैनिक अरुण वानखडे, राज्य पर्यटन सचिव के. वाय. सुरवाडे, माजी तालुकाध्यक्ष शरद बोदडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. सामाजिक ऐक्य आणि समतेचा संदेश देत कार्यक्रमात मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवण्यात आला.

यानंतर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने प्रदेश उपाध्यक्ष डॉ. जगदीश पाटील व विधानसभा क्षेत्र प्रमुख ॲड. चेतन झनके यांनी पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. शहरातील विविध भागांतून भीमसैनिकांनी मोटरसायकल रॅली काढत जयंतीचा जल्लोष साजरा केला.
तसेच वंचित बहुजन आघाडी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा नेते संजय ब्राह्मणे विश्वनाथ मोरे जिल्हा सचिव समाधान गवई तसेच ज्येष्ठ मार्गदर्शक वसंत लहासे संजय खडसे इत्यादी मुक्ताईनगर येथे येऊन महामानव बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना दिली.

शैक्षणिक क्षेत्रातही जयंतीनिमित्त उत्साह दिसून आला. संत मुक्ताबाई महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी महाविद्यालयापासून प्रवर्तक चौकापर्यंत रॅली काढत सामाजिक संदेश दिला. प्राचार्य डॉ. आय. डी. पाटील व प्राध्यापक वर्ग यावेळी उपस्थित होते.
दरम्यान, चौकातील छत्रपती शाहू महाराज व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यांनाही मान्यवरांनी अभिवादन केले. आमदार चंद्रकांत पाटील यांचे सुपुत्र हर्षराज पाटील व उपनगराध्यक्ष देवयानी शिरसाठ यांनी पुष्पगुच्छ अर्पण करून आदर व्यक्त केला.
मुक्ताईनगर एसटी आगारातर्फे देखील जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. आगारातून प्रवर्तक चौकापर्यंत भव्य मिरवणूक काढण्यात आली. चालक-वाहक, कर्मचारी व पदाधिकाऱ्यांचा मोठा सहभाग यामध्ये दिसून आला.
तसेच पोलीस प्रशासनाच्या वतीनेही पोलीस निरीक्षक आशिष आडसूळ यांनी सहकाऱ्यांसह महामानवांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
मुक्ताईनगरात साजरी झालेली डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती ही केवळ औपचारिकता न राहता सामाजिक ऐक्य, समता आणि बंधुभावाचा संदेश देणारी ठरली. विविध राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि प्रशासकीय घटक एकत्र येत अभिवादन करत असल्याचे चित्र हे आंबेडकरांच्या विचारांची व्यापकता अधोरेखित करणारे आहे. रॅली, मिरवणुका आणि सामूहिक सहभागातून समाजातील सर्व स्तरांमध्ये जागरूकता आणि एकात्मतेचा भाव दृढ होत असल्याचे या निमित्ताने पुन्हा एकदा स्पष्ट झाले.



