पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत राहुल गांधींची बैठक

सीआयसी निवडीवर व्यक्त केली नाराजी
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : केंद्रीय माहिती
आयोगाच्या (सीआयसी) प्रमुख पदासह आठ माहिती आयुक्तांच्या नियुक्तीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय पॅनलची महत्त्वाची बैठक बुधवारी पार पडली. या बैठकीत नियुक्त्यांबाबत निर्णय झाल्याचे समजते. मात्र, निवड प्रक्रियेवर नाराजी व्यक्त करत लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी असहमती दर्शवली.
सुमारे दीड तास चाललेल्या या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तसेच राहुल गांधी उपस्थित होते. सूत्रांच्या माहितीनुसार, संभाव्य उमेदवारांविषयी अधिक माहिती मागणीसह निवड प्रक्रियेची निकष काय होते, यावर राहुल गांधी यांनी प्रश्न उपस्थित केला. प्रक्रियेबाबत समाधान न झाल्याने त्यांनी लिखित आक्षेप नोंदवला.
मनुष्यबळाची टंचाई
देशातील सर्वोच्च आरटीआय अपिलीय प्राधिकरण सध्या गंभीर मनुष्यबळ टंचाईला सामोरे जात आहे. एकूण प्रलंबित प्रकरणे ३०,८३८ असताना केवळ दोन आयुक्त काम करत आहेत, तर आठ पदे रिक्त आहेत.
सरकारने या नियुक्त्यांबाबतची बैठक होणार असल्याची माहिती पूर्वीच सर्वोच्च न्यायालयाला दिली होती. माहिती अधिकार कायद्याच्या कलम १२ (३) अंतर्गत, पंतप्रधान हे समितीचे अध्यक्ष असतात, ज्यामध्ये विरोधी पक्षनेते आणि पंतप्रधानांनी नियुक्त केलेले केंद्रीय मंत्रीदेखील असतात. समिती सीआयसी आणि माहिती आयुक्त म्हणून नियुक्तीसाठी नावे निवडते आणि शिफारस करते.



