भोगवादी संस्कृतीच्या पाठीशी राजसत्तेची शक्ती !! ;गजानन हरणे

आज देशात व समाज रचनेत विशेषतः राजकीय पक्षांच्या संस्कृतीमध्ये भोगवादी व भौतिकवादी दर्शनावर आधारलेली मनोवृत्ती जोपासली जात असलेल्या माणसांचा जास्त भरणा दिसत आहे. त्यामुळे भोगवादी संस्कृती आणि मानवी मुल्यांची संस्कृती यांध्यामध्ये जबरदस्त संघर्ष सुरु आहे. विशेष म्हणजे या भोगवादी व भौतिकवादी संस्कृतीच्या पाठीशी या देशाची राजसत्तेची शक्ती मोठ्या प्रमाणात उभी असतांना दिसते. राजकीय शक्ती ही या भोगवादी संस्कृतीच्या दीशेने जात असल्याचे आपणास दिसून येईल.अनेक प्रकरणे स्त्रीयांच्या बाबतीत असो की भ्रष्टाचार करुन करोड रुपये मिळविणारे प्रकरण असो हे या देशातील संस्कृती बिघडवून ही राजकीय शक्ती या देशाला अधोगतीकडे विशेषतः भोगवादी व भौतिकवादी संस्कृतीकडे वाटचाल करीत असतांना दीसत आहे. एक काळ होता की राजकीय नेता असो की सामाजिक कार्यकर्ता असो या सर्वांबाबत देशातील प्रत्येक माणसाला आदर असे. परंतु आता ही संपूर्ण परिस्थिती या विरोधात जाऊन राजकीय नेता म्हटले की जनतेला त्याची अक्षरशः किळस वाटल्यागत परिस्थिती झाली आहे .आणि ही सर्व परिस्थिती आपल्याला ह्या 75 वर्षांच्या स्वातंत्र्याच्या काळात राजकीय पक्षाच्या ते कोणत्याही पक्षाचे असो या नेत्यांनी निर्माण केली आहे व ती परंपरा दिल्ली पासून तर गल्लीपर्यंत अनेक राजकीय नेते त्यांचे कार्यकर्ते मोठ्या हौसेने राबवित आहेत. या सर्व प्रकरणांबाबत देशातील सामान्य माणसाला चिड आल्याशिवाय राहत नाही. परंतु आज दूर्जन हे शक्तीशाली बनले आहेत. कारण ते संघटीत आहेत. तर सज्जन हे विखुरलेले आहेत. त्यांच्यात संघटन नाही. त्यामुळे या भोगवादी राजकीय नेते आपल्यावर राज्य करण्याचे स्वप्न ते पूर्ण करीत आहेत.
या राजसत्तेतून मिळणारा आर्थिक पैसा हा करोडो रुपयांची उलाढाल करणारा असतो. या पैशांच्या जोरावर ते आज देशावर राज्य करीत आहेत व या राजशक्तीच्या सत्तेखाली या वाईट गोष्टी करून लपवत आहेत. वरून पांढरे कपडे घालून बगळ्यासारखे समाजात वावरत आहेत. पैशातून सत्ता सत्तेतून पैसा कमावणे आजच्या राजकीय नेत्यांना सहज झाले आहे .अशा हरामखोर, हलकट राजकीय नेत्यांना त्यांची जागा दाखवण्याची हिम्मत जनतेत असल्यावरही जनता मात्र निमूटपणे चर्चा करुन काही दीवसानंतर विसरून जातात. अशा प्रकारचे देशात अनेक घटना घडल्या आहेत. भारतीय जनता काही दिवसानंतर त्या सर्व घटना विसरून ‘जसे काही झालेच नाहीं’ अशा प्रकारे वागते व हे राजकीय नेतेसुद्धा काही झाल्या न गत समाजात वावरुन आपले राजकारण करीत आहे. स्वातंत्र्याच्या पुर्वीच्या नेत्यांनी ह्या गोष्टींपासून दूर राहून समाजोपयोगी सर्व समावेशक निधर्मीय राजकारण केले आहे. परंतु सध्या या सर्व क्रांतीकारकांना राष्ट्रभक्तताना नेत्यांनी विसरून आपले भोगवादी राजकारण करण्यास भारतीय राजकीय पक्ष पुढे सरसावत आहेत.
राष्ट्रपिता महात्मा गांधीजींनी सतत सत्याचा आग्रह धरुन सदाचाराचे पालन केले. त्यासाठी त्यांना कितीही त्रास झाला तरी त्यांनी सद्गुणांचा त्याग केला नाही. संकटांना न डगमगता सत्य, अहिंसा, सत्याग्रह, आत्मक्लेश व उपोषणाची वाटचाल अखंडित ठेवली. सत्याचे प्रयोग करुन जीवनाचे , भगवंत भक्तीचे, तपस्येचे, श्रद्धेचे, नैतिकतेचे तत्त्वज्ञान त्यांनी लोकांना समजावून सांगितले. त्यांचे आचार-विचार सुसंगत असल्याने त्यांचे बोलणे, लिहिणे व जगणे यामध्ये कधीही विसंगती आणि अंतर नव्हते. कलियुगात देखील सत्याचा प्रभाव त्यांनी वाढविला. त्यामुळेच ते महात्मा झाले. त्यांच्या पश्चात सत्याचे परिणाम बदलले.असत्याचे मूळ सत्ता संपत्तीत आजच्या जीवनात असल्याचे दिसते. सत्याचा मुलामा चढवून आपले श्रेष्ठत्व सिद्ध केले जात आहे. ‘सत्यमेव जयते’ हे आपलं बीदवाक्य खरं पण असत्याशिवाय एकही दीवस जात नाही. देवाशपथ खरे सांगेन अशी शपथ घेतली तर खोटे सांगण्यास आम्ही विसरत नाही. असत्य हा जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. कोण सत्यवादी आहे? सर्वांना खोटे काम व असत्य बोलणे हे करावेच लागते असा सर्वमान्य सिद्धांत झाला आहे. त्यात बदल करणे अशक्य असल्याचे सर्वजण सांगतात. एकूण असत्याचे मूळ माणसाने माजविलेल्या पैशाच्या अतिशयोक्तीत आहे. द्रवलोभातून येणारे मानसिक दारिद्र्य संपुष्टात आणायचे असेल तर गांधीजीचे नीतिमत्तेचे आचार-विचार आपणास स्वीकारावे, अंगिकारावे लागतील. ‘तत्त्वाची बांधिलकी नसणारे राजकारण हा केवळ शापच आहे. श्रमाशिवाय संपत्ती, सचोटीशिवाय व्यापार आणि त्यागाशिवाय प्रार्थना ही सर्व व्यर्थ आहेत. गाधीजींची ही व्रते आम्ही निरर्थक ठरविली आहेत. त्यामुळे जीवनाचा पोत बिघडला आहे. अशावेळी आपण म्हणाला, गांधीजींचे विचार कालबाह्य झाले आहेत, तर ७५ वर्षापूर्वी सत्य-अहिंसेच्या मार्गाने ,तत्त्वाने स्वातंत्र्य कसे मिळविले? भूमिहीन मजुरांना वाटण्यासाठी लाखो एकर जमीन विनोबांना कशी मिळाली? शेकडो डाकू जयप्रकाशांसमोर शरण कसे आले. तेव्हा आपणास पुनःश्च नैतिक व सत्याची सर्वश्रेष्ठ शक्ती जागृत करावी लागेल, अनितीचा व असत्याचा मार्ग आम्ही स्वीकारल्याने या दुरावस्थेतत आपण अडकलो आहोत. श्रीकृष्णाच्या महानिर्वाणानंतर कलियुग सुरु झाले आणि असत्याचा प्रभाव-दबाव वाढला. सत्यापेक्षा असत्याला अधिक महत्त्व प्राप्त झाले. त्यामुळे दिवसेंदिवस सत्याकडे डोळेझाक केली जाऊ लागली. त्यामधूनच व्यक्तीच्या किंवा समाजाच्या हिताच्या खऱ्या गोष्टी सांगितल्या तर ते ऐकून घेण्याऐवजी लोक खरे बोलणा-यालाच शत्रू समजू लागले आहेत. कलियुग म्हणजे खोट्यांचा बाजार। लोक इतके आंधळे झाले आहेत की, सत्य त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला तरी ते ऐकण्यास तयार नाहीत. चांगले विचार सांगणाऱ्याला वैरी समजतात. ही वास्तवता कोणालाही नाकारता येणार नाही. ‘माणसं खरंच एवढी आंधळी कशी होतात? सत्याकडे इतकी डोळे झाक कशी केली जाते. लोकांना राजकर्त्यांना स्वार्थ सत्याकडे पाहू देत नाही का? की तिचा गळा घोटून हे बाह्य जगात वावरत असतील?
आजच्या जगात-समाजात सत्यानं व सदाचाराने जगण्यास प्रतिकूल परिस्थिती आहे का ?या समाज रचनेत खोटं खोटं करणारे, भ्रष्टाचार, खुशामत करणारे, माना मुरगळणारे, शोषण करणारे, फसवणारे, वाममार्गाने जाणारे लोक आहेत. त्यांच्याकडे सत्ता संपत्ती, बंगला, मोटारी असे वैभव असेल. समाजामध्ये त्याचं नाव मोठं होईल, अशावेळी आपल्या मनांत येईल की, ‘आम्ही आपले एवढ्या सत्यानं जगतो पण आमचं काहीच नाही. तेव्हा असं वाटणं ही एक आत्मवंचना आहे, असं मला वाटतं. सत्ता-संपत्ती, प्रतिष्ठा, किर्ती, मान- सन्मान, सत्कार हेच हवे असेल तर दुर्योधनाचे, धुःशासनाचे व शकुनीचे मार्ग आहेतच मोकळे. अशावेळी आपणास शुद्ध आचार-विचारांच्या पातळीवर निर्णय घ्यावे लागतील. उपेक्षा व अपेक्षा सत्याचरणामुळे समाजाकडून उपेक्षा होईल. अशावेळी आपण एकाकी पडतो. अशा परिस्थितीत असत्याशी नीतीधैर्याने सामना करण्यात खरा पुरुषार्थ आहे. दुर्जनांशी तडजोड करून त्यांच्या मार्गाने वाटचाल करण्याचा विचार करणे म्हणजे सतप्रवृत्तीचा पराभव आहे, याची जाणीव ठेवण्याची आज आवश्यकता आहे.
दोन संस्कृतीत संघर्ष……
तेला-तुपाचे दिवे गेले, विजेचे दीवे आले. जाडेभरडे सुती कपडे जाऊन पॉलिस्टर कपडे आले. विज्ञानाने भौतिक प्रगती झाली पण विज्ञानाला माणसाचे मन बदलता आलेले नाही. तेव्हा भौतिक प्रगतीने मनुष्य सुखी झाला असे आपणास ठामपणे म्हणता येणार नाही. अनेक माणसे शांतीच्या शोधात आहे. असत्यातून धकाधकीचे प्रमाण वाढत आहे, एकूणच आपण भोगवादी व भौतिकवादी जीवन जगत आहोत का ? याचा विचार आपण आपल्या अंतर्गत मनाशी करून निर्णय घेऊन तसे वागणे काळाची गरज आहे. म्हणून भोगवादी संस्कृतीला राजकीय शक्ती देणे थांबवणे गरजेचे आहे. व जनतेने सुद्धा त्यासाठी पुढाकार घेऊन भोगवादी संस्कृतीला रोखण्या करता आपले मन मनगट पक्के केले पाहिजे. त्यासाठी संघर्षरत राहिले पाहिजे.
गजानन ओंकार हरणे,
समाजसेवक,
लेखक, साहित्यिक, वक्ता, तज्ञ मार्गदर्शक, संयोजक निर्भय बनो जन आंदोलन .
संवाद……



