जिल्ह्यात मेळावे घेतल्यास बेरोजगारी थांबेल – खा. जाधव

शेगावात बेरोजगार मेळावा व रक्तदान शिबीर
प्रतिनिधी राजेंद्र मुंडे
शेगाव प्रत्येक तालुक्यात चार पाच महिन्यांच्या अंतराने बेरोजगार मेळावे आयोजित केल्यास शिक्षण घेऊन नोकरीसाठी बेरोजगारांची होणारी भटकंती थांबेल आणि बेरोजगारीवर मात करून बेरोजगार कुटुंबातील युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध केल्या जातील, असे प्रतिपादन २६ नोव्हेंबर रोजी स्थानिक वर्धमान भवनमध्ये त्यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित बेरोजगार मेळावा व रक्तदान शिबिरप्रसंगी बोलताना खासदार तथा केंद्रीय संवाद व माहिती तंत्रज्ञान समिती, केंद्रीय ग्राम विकास समिती अध्यक्ष प्रतापराव जाधव यांनी केले. पुढे बोलतांना त्यांनी नोकरीची संधी घेऊन कंपन्या आपल्या दारी या बेरोजगार मेळाव्याच्या रूपाने येतात. त्यामुळे भटकण्याची गरज पडत नाही तसेच नियुक्ती झालेल्या कंपनीत युवकांनी मन लावून काम करावे, असे आवाहनही त्यांनी केले.



