अप्पर तहसील कार्यालयासाठी केनवड येथे साखळी उपोषण

प्रतिनिधि: वाशिम
प्रस्तावित अप्पर तहसील केनवड येथून अन्यत्र हलवू नये, यासाठी केनवड सह परिसरातील नागरिकांनी आठवडी बाजारातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरासमोर मंगळवार दिनांक 29 जुलै 2026 रोजी सकाळी नऊ वाजल्यापासून साखळी उपोषण सुरू केले आहे.
केनवड हे रिसोड तालुक्यासह परिसरातील 20 ते 25 गावांचे प्रमुख प्रशासकीय, शैक्षणिक, आरोग्य, व्यापारी व आर्थिक केंद्र म्हणून ओळखले जाते. येथे शासकीय जागा, शासकीय इमारत तसेच अप्पर तहसील कार्यालय सुरू करण्यासाठी आवश्यक त्या सर्व गोष्टी असताना प्रस्तावित अपर तहसील कार्यालय इतरत्र हलवण्याचा प्रयत्न चालू आहे. प्रशासकीय सोय आणि महामार्ग लगत असल्याने दळणवळणाची उत्तम सोय उपलब्ध आहे. केनवड सह आजूबाजूच्या गावांना फक्त शासकीय कामांसाठी 40 किमी दूर रिसोड गाठावे लागे परंतु आता अप्पर तहसील कार्यालय केनवड येथे प्रस्तावित आहे, आठवडी बाजार, शासकीय बँका, मध्यवर्ती बँक, महावितरण कार्यालय, ग्रामीण दवाखाना इत्यादी सर्व सोयी उपलब्ध असताना प्रस्तावित कार्यालय इतरत्र हलवण्याचा घाट घातला जात असल्याने नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने साखळी उपोषण सुरू केले आहे.
प्रस्तावित अप्पर तहसील कार्यालय इतरत्र हलवल्यास आंदोलनाचा इशारा नागरिकांतर्फे देण्यात आला आहे.



