बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

पीएम किसान योजना: प्रलंबित अटींच्या पूर्ततेसाठी २ ते ३१ ऑक्टोबर दरम्यान विशेष मोहीम

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधी – शंकर शिवरकर

देऊळगाव राजा दि.9 : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-KISAN) योजनेच्या प्रलंबित अनिवार्य अटींच्या पूर्ततेसाठी २ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर २०२६ दरम्यान विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांनी आधार संलग्नीकरण (Aadhaar Seeding) व ई-केवायसी (e-KYC) ची पूर्तता त्वरित करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी केले आहे.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबांना थेट लाभ हस्तांतरण (DBT) पद्धतीने आर्थिक लाभ देण्यात येतो. हा लाभ केवळ पात्र व प्रमाणित लाभार्थ्यांनाच मिळावा, यासाठी केंद्र शासनाने योजनेअंतर्गत भूमि अभिलेख नोंदी अद्ययावत करणे (Land Seeding), बँक खात्याशी आधार संलग्नीकरण (Aadhaar Seeding) आणि ई-केवायसी (e-KYC) या बाबी अनिवार्य केल्या आहेत. या अनिवार्य बाबींची पूर्तता करण्यासाठी मागील दोन वर्षांत देशव्यापी मोहीम, जनजागृती कार्यक्रम व सामाईक सुविधा केंद्रांमार्फत आवाहन करण्यात आले होते. तरीही जिल्ह्यातील काही लाभार्थ्यांच्या Land Seeding, Aadhaar Seeding किंवा e-KYC यापैकी एक किंवा अधिक बाबी अद्याप प्रलंबित आहेत. त्यांनी आधार व ई-केवायसी मोहिमेदरम्यान करून घ्यावे, असे आवाहन केले आहे.

बँक खाते आधारशी संलग्न करणे: जिल्ह्यातील सुमारे ४ हजार १०१ लाभार्थ्यांची बँक खाती अद्याप आधारशी संलग्न झालेली नाहीत. अशा लाभार्थ्यांनी ज्या बँकेत खाते आहे, त्या बँकेच्या शाखेत जाऊन बँक खाते आधार क्रमांकांशी संलग्न करून घ्यावे. तसेच इंडिया पोस्ट पेमेंट्‍स बँक (IPPB) मार्फत आधार संलग्न बँक खाते उघडण्याची सुविधाही उपलब्ध आहे. अडचणी आल्यास संबंधित बँक, सहाय्यक कृषी अधिकारी अथवा कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधावा.

ई-केवायसी प्रमाणीकरण पूर्ण करणे: योजनेचा लाभ खऱ्या व जिवंत लाभार्थ्यांपर्यंतच पोहोचावा यासाठी ई-केवायसी अनिवार्य आहे. जिल्ह्यातील २ हजार ०२८ लाभार्थ्यांचे ई-केवायसी अद्याप प्रलंबित आहे. याशिवाय, सन २०२६-२७ साठी वार्षिक ई-केवायसी प्रलंबित असलेल्या २ लाख ६३ हजार ८०७ लाभार्थ्यांनीही ई-केवायसी पूर्ण करणे आवश्यक आहे. यासाठी नजीकच्या सामाईक सुविधा केंद्रात (CSC) जाऊन बायोमेट्रिक प्रमाणीकरण करणे. किंवा PM-KISAN मोबाईल ॲपद्वारे ‘फेस ऑथेंटिकेशन’च्या माध्यमातून ई-केवायसी पूर्ण करावे .

केंद्र शासनाच्या निर्देशानुसार, या विशेष मोहिमेच्या कालावधीतही अनिवार्य बाबींची पूर्तता न करणाऱ्या लाभार्थ्यांना विहित प्रक्रियेनुसार नव्याने अर्ज करून आवश्यक पडताळणी प्रक्रिया पूर्ण करावी लागू शकते. त्यामुळे सर्व पात्र शेतकऱ्यांनी ३१ ऑक्टोबर २०२६ पूर्वी प्रलंबित असलेल्या सर्व अनिवार्य बाबींची पूर्तता करून घ्यावी, असे आवाहन कृषी प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button