“रॅली नव्हे, जनभावनांचा महासागर; बुलढाण्यात महालेंच्या नावाची लाट”

स्टार भारत लाईव्ह एकसप्रेस दै. आवाज न्यायाचा
चिखली तालुका प्रतिनिधी अरुणा दत्तात्रय खंडागळे
सुपरहिट रॅलीनंतर आ.श्वेता महालेंची बुलढाण्यात सुपर ‘चाय पे चर्चा’, स्वच्छता व प्रशासन यासाठी भेट..
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खासगी सचिव श्री. विद्याधर महाले यांच्या वाढदिवसानिमित्त बुलढाणा येथे आयोजित अभिष्टचिंतन सोहळ्याच्या निमित्ताने निघालेल्या भव्य रॅलीला मिळालेला अफाट प्रतिसाद सध्या जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे. कोणत्याही औपचारिक आवाहनापेक्षा नागरिकांनी स्वतःहून सहभाग घेत रॅलीला दिलेला प्रतिसाद हा महाले यांच्या बुलढाणा जिल्ह्यातील जनसंपर्काची आणि लोकप्रियतेची प्रचिती देणारा असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
रॅलीच्या मार्गावर नागरिकांनी मोठ्या संख्येने गर्दी करत उत्स्फूर्तपणे स्वागत केले. विशेष म्हणजे या कार्यक्रमाशी आपलेपणाची भावना व्यक्त करत अनेक नागरिकांनी स्वतःहून चहा, नाश्ता व पाण्याचे मोफत वाटप केले. रॅलीतील सहभागी आणि नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी विविध ठिकाणी नागरिकांनी केलेल्या या सेवाभावी व्यवस्थेने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
इतकेच नव्हे तर बुलढाणा शहरातील काही ऑटोचालकांनी सभास्थळी जाणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना स्वयंस्फूर्तीने मोफत प्रवासाची सुविधा उपलब्ध करून दिली, अशी माहिती अनेक नागरिकांनी दिली. मोठ्या राजकीय कार्यक्रमांमध्ये आयोजकांकडून व्यवस्था केली जाते; मात्र येथे नागरिकांनी स्वतःहून पुढाकार घेत केलेले स्वागत आणि सेवा ही विशेष बाब ठरल्याचे उपस्थितांकडून सांगण्यात आले.
या उत्स्फूर्त प्रतिसादाची दखल घेत आमदार श्वेता महाले पाटील यांनी आज बुलढाणा शहराला भेट दिली. कालच्या कार्यक्रमानंतर शहरातील नागरिकांनी व्यक्त केलेले प्रेम आणि आपुलकी पाहून त्यांनी विविध ठिकाणी नागरिक, व्यापारी, कार्यकर्ते, पदाधिकारी तसेच पत्रकार बांधवांच्या भेटी घेत संवाद साधला. नागरिकांशी अनौपचारिक चर्चा करताना कालच्या कार्यक्रमातील अनुभव, शहरातील प्रश्न आणि पुढील विकासकामांबाबतही त्यांनी चर्चा केली.
दरम्यान, कालच्या भव्य रॅलीनंतर निर्माण झालेल्या कचऱ्याची स्वच्छता तातडीने करण्यात यावी, यासाठी आमदार श्वेता महाले पाटील यांनी सकाळीच बुलढाणा नगर परिषदेचे मुख्याधिकारी गणेश पांडे यांच्याशी चर्चा करून आवश्यक सूचना दिल्या.
सायंकाळी बुलढाणा येथे प्रत्यक्ष भेट देऊन त्यांनी स्वच्छता व्यवस्थेची पाहणी केली आणि मुख्याधिकाऱ्यांशी पुन्हा चर्चा केली. त्यामुळे भव्य राजकीय शक्तिप्रदर्शनानंतर शहराच्या व्यवस्थेची जबाबदारीही तितक्याच गांभीर्याने घेतल्याचा संदेश यातून देण्यात आला.
यानंतर आमदार श्वेता महाले यांनी कारंजा चौक येथील प्रसिद्ध हॉटेल ‘श्रीराम’ येथे नागरिकांसोबत ‘चाय पे चर्चा’ केली. संगम चौकातील ‘येवले अमृततुल्य’ येथेही भेट देत त्यांनी नागरिकांशी संवाद साधला.
मोठ्या राजकीय कार्यक्रमानंतर दुसऱ्याच दिवशी रस्त्यावर उतरून नागरिकांमध्ये मिसळण्याची त्यांची भूमिका चर्चेचा विषय ठरली.
विद्याधर महाले यांच्या वाढदिवसानिमित्त झालेल्या रॅलीने बुलढाणा शहरात निर्माण केलेले वातावरण, नागरिकांचा स्वयंस्फूर्त सहभाग आणि त्यानंतर आमदार श्वेता महाले पाटील यांनी साधलेला थेट जनसंवाद यामुळे या कार्यक्रमाला केवळ वाढदिवसाच्या सोहळ्याचे स्वरूप न राहता त्याला व्यापक सामाजिक आणि राजकीय संदर्भ प्राप्त झाल्याचे चित्र दिसून आले. यावेळी भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक आणि पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते





