सिंदखेडराजा मतदार संघातील पर्यटन विकासाला मिळणार गती; आमदार मनोज कायंदे यांच्या पाठपुराव्याला यश, पर्यटन मंत्र्यांसोबत बैठक संपन्न

सिंदखेडराजा मतदार संघातील पर्यटन विकासाला मिळणार गती; आमदार मनोज कायंदे यांच्या पाठपुराव्याला यश, पर्यटन मंत्र्यांसोबत बैठक संपन्न
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी ; – शंकर शिवरकर
देऊळगावराजा:सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघाचे आमदार मनोज कायंदे यांच्या विशेष पाठपुराव्यातून आज बुलडाणा जिल्ह्यातील विविध पर्यटनस्थळांच्या सर्वांगीण विकासासंदर्भात एक महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली.
ही बैठक जिल्ह्याचे पालकमंत्री ना. मकरंद आबा पाटील यांच्या माध्यमातून आणि राज्याचे पर्यटन मंत्री ना. शंभूराजे देसाई यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत पार पडली.या बैठकीत जिल्ह्यातील समृद्ध ऐतिहासिक, सांस्कृतिक व पर्यटन वारसा अधिक प्रभावीपणे विकसित करण्याच्या दृष्टीने विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. बुलडाणा जिल्ह्यातील पर्यटन विकासाला अधिक गती देण्यासाठी लवकरच मा. मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली एक विशेष बैठक आयोजित करण्याचे देखील या वेळी निश्चित करण्यात आले.
MTDC मार्फत सिंदखेडराजा येथे पर्यटकांसाठी अत्याधुनिक सुविधा
या बैठकीत आपल्या सर्वांच्या अभिमानाचे स्थान असलेल्या मातृतीर्थ सिंदखेडराजा येथे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (MTDC) मार्फत पर्यटकांच्या सोयी-सुविधांसाठी विशेष नियोजन करण्यावर भर देण्यात आला. यामध्ये सिंदखेडराजा येथे येणाऱ्या देश-विदेशातील पर्यटकांना उत्तम दर्जाच्या निवास व्यवस्था, माहिती केंद्र आणि इतर अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यासंदर्भात सकारात्मक चर्चा झाली. मातृतीर्थाचा विकास करून जागतिक नकाशावर या ऐतिहासिक स्थळाला मोठी ओळख मिळवून देण्याचा मानस आमदार कायंदे यांनी या वेळी व्यक्त केला.
या बैठकीला पर्यटन विभागाचे उच्चपदस्थ अधिकारी, प्रशासकीय अधिकारी आणि संबंधित मान्यवर उपस्थित होते. आमदार मनोज कायंदे यांच्या या यशस्वी प्रयत्नांमुळे सिंदखेडराजा मतदारसंघासह संपूर्ण बुलडाणा जिल्ह्यातील पर्यटन क्षेत्राचा चेहरामोहरा बदलण्यास मदत होणार आहे.



