वांद्रे-वरळी सी लिंकवर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अनोखे अभिवादन

जळगाव | १४ एप्रिल २०२४भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची आज 14 एप्रिल रोजी जयंती आहे. बाबासाहेबांच्या जयंती निमित्ताने संपूर्ण देशभरात जल्लोष देखील सुरु झाला असून देशातच नव्हे तर विदेशातही बाबासाहेबांना मानवंदना दिली जाते. वैचारिक कार्यक्रम ठेवून बाबासाहेबांना अनोखं अभिवादन केलं जातं. मुंबईतही बाबासाहेबांना यंदा अनोखं अभिवादन करण्यात आलं आहे. प्रसिद्ध वांद्रे-वरळी सी लिंकवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा झळकावण्यात आली आहे. लेझर शोच्या माध्यमातून ही प्रतिमा झळकवण्यात आली आहे. त्यामुळे हा अनोखा नजारा पाहून येणाऱ्या जाणाऱ्यांचे ऊर भरून येताना दिसत आहेत.या निमित्ताने वांद्रे-वरळी सी लिंकवर आकर्षक विद्यूत रोषणाई करण्यात आली आहे. यावेळी सी लिंकवर लेझर शो करण्यात आला असून या लेझर शोमध्ये बाबासाहेबांच्या दोन प्रतिमा दिसत आहेत. त्याशिवाय तिरंगा झेंडा आणि अशोक चक्रही या लेझर शोमध्ये दिसत आहे.विस्तीर्ण असा वांद्रे-वरळी सी लिंक… त्यावर लावलेले दिवे… विद्यूत रोषणाई आणि लेझर शोमधून दिसणाऱ्या प्रतिमा… वर ढगांचं अच्छादन तर पुलाखाली अथांग पसरलेला काळाशार अरबी समुद्र… या पार्श्वभूमीवर हा लेझर शो पाहून येणारे जाणारे हरखून जात आहेत. बाबासाहेबांची प्रतिमा दिसताच अपसूकच तोंडातून जयभीम असे उद्गार येत आहेत.



