बोराळा खुर्द येथे ‘खेती बचाव अभियान’ उत्साहात; कृषी अधिकारी रमेश जाधव यांचे शेतकऱ्यांना मार्गदर्शन

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
संग्रामपूर तालुका प्रतिनिधी :
रतन भगत जळगाव जामोद,
दि. ९ जून २०२६ : जळगाव जामोद तालुक्यातील बोराळा खुर्द येथे ‘खेती बचाव अभियान’ अंतर्गत कृषी जनजागृती कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. शेतकऱ्यांना आधुनिक, शाश्वत व नैसर्गिक शेतीविषयक माहिती उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास गावातील शेतकरी, युवक व महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली.कार्यक्रमात कृषी विज्ञान केंद्र, जळगाव जामोद येथील तज्ज्ञ मार्गदर्शक संजय उबाळे यांनी रासायनिक खतांचा संतुलित वापर, जमिनीचे आरोग्य संवर्धन तसेच उत्पादनवाढीसाठी आवश्यक उपाययोजनांबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. विषय विशेषज्ञ (कीटकशास्त्र) अनिल गाभणे यांनी जैविक कीटकनाशकांचा वापर, कीड व्यवस्थापन आणि पर्यावरणपूरक शेती पद्धतींचे महत्त्व विशद केले.तालुका कृषी अधिकारी रमेश जाधव यांनी रुंद सरी-वरंबा पद्धतीचे फायदे, पिक व्यवस्थापन तसेच कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजनांची माहिती शेतकऱ्यांना दिली. यावेळी उपकृषी अधिकारी बोंबटकर, सहाय्यक कृषी अधिकारी अविनाश गाडगे, निकम तसेच सरिता भगत यांची प्रमुख उपस्थिती होती.सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक सागर राऊत यांनी नैसर्गिक शेती, नैसर्गिक निविष्ठा निर्मिती आणि त्यातून होणारे आर्थिक व पर्यावरणीय फायदे याविषयी मार्गदर्शन केले.शेतकऱ्यांनी कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवत विविध कृषी विषयांवरील शंकांचे निरसन करून घेतले. शेतीच्या शाश्वत विकासासाठी आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रसार करण्यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले. कार्यक्रम शांततापूर्ण आणि उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरीत्या संपन्न झाला.



