पावसाने दडी मारल्याने खामगाव परिसरातील सोयाबीन पीक करपले; शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी : गजानन तांगडे,खामगांव
बुलढाणा जिल्हा सह खामगांव तालुक्यातील परिसरात पावसाने दीड ते दोन महिन्यांपासून दडी मारल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक वार्षिक उत्पन्नाचे प्रमुख पीक असलेले सोयाबीन संकटात सापडले आहे. पावसाअभावी शेतकऱ्यांच्या डोळ्यादेखत सोयाबीनचे पीक करपून जात असल्याचे चित्र परिसरात पाहायला मिळत आहे.
पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिकांची वाढ खुंटली असून उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत असून, आभाळाकडे टक लावून पावसाची प्रतीक्षा करत आहेत. पावसाअभावी शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत असल्याने शासनाने तातडीने दखल घेण्याची मागणी होत आहे.
शासनाने संबंधित परिसरातील सोयाबीनसह इतर पिकांचे तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी. तसेच पावसाअभावी निर्माण झालेल्या परिस्थितीचा विचार करून जनावरांसाठी चारा व पाण्याची उपलब्धता करून द्यावी, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.



