दामिनी पथकाची गस्त नेमकी कुठे?

शहरातील काही परिसरात मुली-महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न; शाळा परिसरातील उपस्थितीवर प्रश्न
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी – शंकर शिवरकर
देऊळगाव राजा : शहरातील काही परिसरात मुली व महिलांच्या सुरक्षेशी संबंधित गंभीर घटनांची पोलिस ठाण्यात नोंद झाल्याच्या पार्श्वभूमीवर दामिनी पथकाच्या गस्तीबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. विशेषतः शाळा-महाविद्यालय परिसरात पथकाची नियमित उपस्थिती दिसते का, याकडे पालक व नागरिकांचे लक्ष लागले आहे.
दामिनी पथकाचे कार्य महिलां व मुलींच्या सुरक्षेबाबत जनजागृती करणे, छेडछाड किंवा त्रासाच्या घटनांवर लक्ष ठेवणे, संवेदनशील ठिकाणी गस्त घालणे तसेच गरज भासल्यास तातडीने मदत उपलब्ध करून देणे, असे आहे. त्यामुळे शाळा सुटण्याच्या वेळेत, बसस्थानक, बाजारपेठ, क्लासेस तसेच विद्यार्थिनींची वर्दळ असलेल्या परिसरात पथकाची नियमित गस्त असणे महत्त्वाचे ठरते.
शहरातील काही भागांत मुली-महिलांच्या सुरक्षेशी संबंधित घटनांची नोंद पोलिस ठाण्यात झाल्याचे समोर येत असताना, शाळांच्या परिसरात दामिनी पथकाची नियमित फेरी दिसत नसल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. त्यामुळे संबंधित पोलिस प्रशासनाने संवेदनशील परिसरातील गस्तीचे नियोजन अधिक प्रभावी करावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
तसेच समृद्धी महामार्ग परिसरात दामिनी पथकाची नेमकी भूमिका व कार्यक्षेत्र काय आहे, याबाबतही नागरिकांमध्ये चर्चा आहे. शहरातील मुली-महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य देताना पथकाची गस्त कोणत्या भागात आणि कोणत्या वेळेत होते, याबाबतही स्पष्टता असावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
मुली व महिलांच्या सुरक्षिततेसाठी शाळा-महाविद्यालय परिसरासह संवेदनशील ठिकाणी नियमित गस्त, जनजागृती आणि तातडीची मदत व्यवस्था प्रभावी करावी, अशी मागणी पालक, स्थानिक नागरिक व तरुणांकडून होत आहे.



