आज जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार काँग्रेसचा भव्य ‘आसूड मोर्चा’

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
चिखली…. प्रतिनिधी
आरुणा दत्तात्रय खंडागळे
सहभागी होण्याचे राहुलभाऊ बोंद्रे, प्रकाश पाटील अवचार यांचे आवाहन..
बुलढाणा : राज्यातील शेतकरी, विद्यार्थी, बेरोजगार आणि सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांकडे केंद्र व राज्य सरकारने केलेल्या दुर्लक्षाविरोधात काँग्रेस आता रस्त्यावर उतरली असून सोमवार १ जून रोजी दुपारी १ वाजता बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर काँग्रेसचा भव्य ‘आसूड मोर्चा’ धडकणार आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धनदादा सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघणार असून भाजप सरकारच्या जनविरोधी धोरणांविरोधात जिल्हा काँग्रेस जोरदार एल्गार पुकारणार आहे. या आसूड मोर्चात जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी, महिला, युवक काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी हजारोंच्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा काँग्रेस कमिटीचे मावळते अध्यक्ष राहुलभाऊ बोंद्रे, नवनियुक्त अध्यक्ष प्रकाश पाटील अवचार यांनी केले आहे.
शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या नावाखाली अटी-शर्तींचा फास लावला जात आहे. पीककर्जासाठी जाचक अटी लादून शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी केली जात आहे. दुसरीकडे पेट्रोल, डिझेल, सीएनजी आणि गॅस सिलिंडरच्या दरवाढीने सामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. नीट परीक्षेतील कथित घोटाळ्यामुळे लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करण्यात आला असून स्मार्ट मीटरच्या सक्तीमुळे जनतेत तीव्र नाराजी आहे. या सर्व प्रश्नांवर सरकारला जाब विचारण्यासाठी काँग्रेसचा आसूड मोर्चा काढण्यात येत आहे. सोमवार १ जून रोजी दुपारी १२ वाजता गर्दे हॉल येथून मोर्चाला सुरुवात होणार असून कारंजा चौक, जनता चौक, जयस्तंभ चौक मार्गे हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे. ✍️



