देऊळगाव राजा येथील श्री कालिका दुर्गा उत्सव मंडळातर्फे ‘फॅन्सी ड्रेस’ स्पर्धेचे आयोजन; २५ बालकांचा सहभाग

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी – शंकर शिवरकर
देऊळगाव राजा: येथील अग्रसेन चौक परिसरातील श्री कालिका दुर्गा उत्सव मंडळाच्या वतीने नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून लहान मुला-मुलींसाठी ‘फॅन्सी ड्रेस’ (वेशभूषा) कार्यक्रमाचे उत्साहात आयोजन करण्यात आले होते. बालकांचा उत्साह वाढवणे आणि त्यांच्या कलागुणांना वाव देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.
या कार्यक्रमात परिसरातील २५ लहान मुला-मुलींनी वेगवेगळ्या वेशभूषा करून उत्स्फूर्तपणे भाग घेतला. विशेष म्हणजे, या कार्यक्रमासाठी मंडळाकडून कोणतीही प्रवेश फी आकारण्यात आली नव्हती. तसेच मुलांमध्ये लहान वयातच स्पर्धेची नकारात्मक भावना निर्माण होऊ नये, म्हणून कोणताही नंबर (क्रमांक) न काढता सहभागी झालेल्या सर्वच बालकांना आकर्षक बक्षिसे देऊन सन्मानित करण्यात आले.
बालकांचा उत्साह आणि आनंद द्विगुणित करण्यासाठी श्री कालिका दुर्गा उत्सव मंडळाच्या वतीने दररोज नवनवीन उपक्रम आणि वेगवेगळ्या खेळांचे आयोजन केले जात आहे. मंडळाच्या या स्तुत्य उपक्रमांमुळे सध्या अग्रसेन चौक आणि परिसरात अतिशय भक्तीमय, आनंदी आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.


