धावत्या एस.टी. बसला आग!

अकोट l दि. 2 मार्च रोजी अकोट आगारची एम.एच. 40 एन 9893 क्रमांकाची हि बस प्रवाशांसहित शहापूर येथे जाण्यासाठी सकाळी 8: 30 च्या सुमारास डेपो मधून निघाली. मोहाळा पासून 3 किलोमीटर अंतरावर दूर 9 वाजताच्या सुमारास प्रवासात दरम्यान ड्रायव्हर सीट जवळ असलेल्या गिअर जवळून धूर व आग निघताना चालकाला गाडीला आग लागली असल्याचे निदर्शनास येताच चालक राजेश बिजागिरे यांनी ताबडतोब बस थांबवली व बसच्या बाहेर निघाले. आणि बस मधील प्रवाशांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करीत होते. बस मध्ये असलेले अग्निरोधक यंत्र आग विझविण्यासाठी चालक बिजागिरे यांनी बाहेर काढले, मात्र बस मध्ये असलेले अग्निरोधक यंत्राचा उपयोग न झाल्यामुळे आग विझवण्यास विलंब झाला व तेवढ्यातच आगीने प्रचंड रुद्र रूप धारण केले आणि आग भीषण स्वरूपात वाढत गेली असे असल्याचे प्रत्यक्षदर्शीं कडून समजते.
घटनास्थळावरील प्रत्यक्षदर्शीनीं अकोट नगर पालिका अग्निशामक दल व अकोट ग्रामीण पोलिसांना माहिती देऊन चालकाच्या मदतीने प्रवाशांना ताबडतोब सुखरूप बाहेर काढले.
घटने संदर्भातील संपूर्ण माहिती बसचे चालक राजेश बिजागिरे यांनी आकोटचे आगार प्रमुख डी.एम. पिसोळे यांना दिली. अग्निशामक दलाला व पोलिसांना या घटनेबाबत माहिती मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी दाखल होताच अकोट नगरपालिकेच्या अग्निशामक दलाने लागलेली आग अथक परिश्रम करून ताबडतोब विझवून आगीवर नियंत्रण मिळवले .मात्र संबंधित आगार प्रमुख पिसोळे घटनास्थळावर न आल्याने नागरिकांनी याप्रसंगी आगार प्रमुखांविषयी रोष व्यक्त केला.
अकोट आगारचे प्रभारक एस. व्ही.गवारगुरु यांनी घटनास्थळ गाठून वरिष्ठ अधिकाऱ्यांना घटनास्थळावरील सविस्तर माहिती दिली तसेच हि आग शॉर्टसर्किटमुळे लागली असल्याची माहिती बसचे चालक बिजागिरे यांनी दिली असून लागलेल्या आगीमध्ये सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नसल्याचेही त्यांनी याप्रसंगी सांगितले मात्र बसचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.



